Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव पालिकेकडे अभिप्रायासाठी

‘स्मार्ट सिटी’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव पालिकेकडे अभिप्रायासाठी

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:55AMपुणे ः प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात औंध, बाणेर आणि बालेवाडी या परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीची ही हद्द वाढविण्याची मागणी नगरसेवकांकडून स्थायी समितीकडे करण्यात आली होती. या प्रस्ताव स्थायी समितीने अभिप्रायासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठविला आहे. प्रशासनाचा अभिप्राय आल्यानंतर हद्द वाढीवर निर्णय होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील विविध शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पुणे शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात औंध, बाणेर आणि बालेवाडी हद्दीतील प्रभांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रभाग क्र. 8 मधील संपूर्ण खडकी स्टेशन रस्ता, भाऊ पाटील रस्ता आणि प्रभाग क्र. 9 मधील हायवेच्या आतील संपूर्ण बालेवाडी आणि बाणेर या भागांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर, विजय शेवाळे आणि प्रकाश ढोरे यांनी केली होती. 

या भागाचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यास येथील विकास झपाट्याने होईल. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत होणार्‍या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतल्या जातात. या बैठका घेण्यासाठी बाणेर बालेवाडी परिसरातील धनकुडे वस्ती येथे बांधण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यालय सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी स्थायीसमोर दिलेल्या प्रस्तावात केली होती. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अभिप्रायासाठी पालिका प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाचा अभिप्राय काय येतो, त्यावर हद्दवाढीचा निर्णय अवलंबून राहणार आहे.