Mon, Jul 22, 2019 01:07होमपेज › Pune › रेशीमकिड्यांचे नॅनो कण ‘एडीस इजिप्ती’वर मात्रा

रेशीमकिड्यांचे नॅनो कण ‘एडीस इजिप्ती’वर मात्रा

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:25AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील संशोधकांना डेंगी, चिकूनगुण्या, मलेरिया असे विविध प्रकारचे रोग पसरवणारा एडीस इजिप्ती डास, घातक जीवाणू तसेच, विविध आजारांचा प्रसार करणार्‍या बुरशींवर मात्रा ठरणार्‍या रेशीम किड्यांपासून तयार केलेल्या नव्या ‘नॅनो कणां’चे संशोधन करण्यात यश आले आहे. त्यामुळे विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे संशोधन उपयोगी पडणार आहे. 

याबाबतच्या शोधनिबंधाला युनायटेड किंगडम येथून निघणार्‍या नेचर पब्लिशिंग ग्रुपच्या ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या ख्यातनाम नियतकालिकात नुकतेच स्थान मिळाले आहे. रेशमी कापडाच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार्‍या या किड्यांपासून एडीस इजिप्ती डांसावर मात्रा ठरणार्‍या नॅनो कणांचा शोध लावण्यात जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील संशोधकांना यश आले आहे. महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र चौधरी, सहकारी संशोधक डॉ. प्रमोद माने, वरिष्ठ संशोधन विद्यार्थी दीपाली कदम, पुण्यातील सेंटर फॉर मटेरियल्स अँड इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे (सी-मेट) डॉ. मनीष शिंदे तसेच, दक्षिण कोरियाच्या हंगेन विद्यापीठातील नॅनो-तंत्रज्ञानाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रो. हेवॉन ली, प्रो. चून किल साँग आणि तेथीलच डॉ. दिनेश अंमळनेरकर यांनी हे संशोधन पूर्ण केले. या संपूर्ण संशोधनासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय काळे आणि प्राचार्य डॉ. सी. आर. मंडलिक यांनी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून दिली, अशी माहिती डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिली.

याबाबत डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले की, रेशीमकिडा कोष तयार करतो, तेव्हा त्याच्यापासून धागा मिळतो. या धाग्यात दोन प्रथिने (प्रोटीन) असतात. त्यापैकी ‘फायब्रॉईन’ हे प्रथिन या अभ्यासासाठी वेगळे करण्यात आले. ते वापरून सोने व चांदीचे नॅनो कण तयार करण्यात आले. या प्रथिनामुळे या कणांना वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म प्राप्त झाले. या कणांचा माणसाला हानीकारक असलेले जीवाणू आणि बुरशीवर काय परिणाम होतो, याचा शोध घेण्यात आला. त्यासाठी चार प्रकारचे जीवाणू आणि ‘अ‍ॅस्परजेलस फ्युमिगेट्स’ ही शस्त्रक्रियेदरम्यानची जखम चिघळण्यास कारणीभूत ठरणारी बुरशी निवडण्यात आली. त्यातून असे निष्पन्न झाले की, रेशीमकिड्यांपासून तयार केलेल्या नॅनो-कणांमुळे हे सर्व घातक जीव नष्ट झाले, असे डॉ. माने यांनी सांगितले. रेशीमकिड्यापासून तयार करण्यात आलेल्या नॅनो कणावरील संशोधन 2016 च्या सुरुवातीला पूर्ण झाले. आफ्रिकेत धुमाकूळ घातलेल्या ’झिका’ विषाणू ‘एडीस इजिप्ती’ या डासामार्फत पसरतो. त्यामुळे या नॅनो-कणांचा ‘एडीस इजिप्ती’ या डासाच्या अळीवर काय परिणाम होतो, हेही तपासण्यात आले. हे नॅनो-कण डासाच्या अळ्यांनाही नष्ट करतात. विशेष म्हणजे डासाच्या अळ्या मेल्या तरी या नॅनो-कणांचा पाण्यातील माशांना काहीच त्रास झाला नाही, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.