होमपेज › Pune › तीर्थक्षेत्रांना शिवशाहीच्या फेर्‍या वाढविणार 

तीर्थक्षेत्रांना शिवशाहीच्या फेर्‍या वाढविणार 

Published On: Jan 09 2018 4:23PM | Last Updated: Jan 09 2018 4:23PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

राज्यातील तुळजापूर, शिर्डी, त्र्यंबकेश्‍वर या तीर्थक्षेत्रांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित शिवशाही बसेसची संख्या व फेर्‍या वाढविण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. विविध तीर्थक्षेत्रांना पुणे विभागातून दररोज सहा हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात, अशी माहितीही समोर आली आहे. यामुळे फेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी गेले कित्येक महिने होत होती.  

एकूण 20 जादा शिवशाही बसेस या तिन्ही ठिकाणी पुणे आगारातून सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी त्र्यंबकेश्‍वरला यापूर्वी सेमी लक्झरी हिरकणी सोडण्यात येत होती. आता हिरकणी बंद करून त्या जागी शिवशाही सोडण्यात येत आहे. तर शिर्डी, तुळजापूरला शिवशाहीच्या फेर्‍या येत्या दहा-पंधरा दिवसांत वाढविण्यात येतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, पुणे ते अजंठा-वेरुळ लेणी येथे शिवशाही बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पुणे ते औरंगाबाद सेवा सध्या सुरू आहे, मात्र अजंठा-वेरुळ या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला सेवाच नसून प्रवाशांना औरंगाबादपर्यंत जाऊन दुसर्‍या बसने अजंठा-वेरुळला जावे लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.