Tue, Apr 23, 2019 07:56होमपेज › Pune › शिवशाही साठी हिरकणींचा बळी

शिवशाही साठी हिरकणींचा बळी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :निमिष गोखले  

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने वातानुकूलित शिवशाही बस राज्यभर दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आल्या. पुणे विभागातही यातील काही शिवशाही बस दाखल झाल्या असून सध्या विविध मार्गांवर धावत आहेत. मात्र ज्या मार्गांवर आरामदायी सेमी लक्झरी हिरकणी धावत होत्या, त्याच मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आल्या असून तब्बल 28 हिरकणींचा बळी गेला आहे. दरम्यान, या मार्गांवरील हिरकणी अन्य मार्गांवर सोडण्यात आल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. 

पुण्याहून लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, पणजी, शिर्डी, महाबळेश्‍वर, बारामती आदी लांब पल्ल्याच्या ठिकाणी विनावातानुकूलित हिरकणी धावायच्या. प्रवाशांनी देखील हिरकणी सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता व एसटीने प्रवास करायचा असल्यास त्यांची पहिली पसंती हिरकणी सेवेलाच असायची. मात्र, जसजशा शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात दाखल होत गेल्या तसतशी हिरकणीला मार्गावरून कमी करण्यात आले व त्या मार्गांवर वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. शिवशाही बसचे तिकीट हिरकणीपेक्षा सरासरी 30 ते 60 रुपयांनी अधिक असून ज्या प्रवाशांना विनावातानुकूलित प्रवास करायचा आहे, अशांना वातानुकूलित शिवशाहीतून नाईलाजास्तव ‘गारेगार’ प्रवास करावा लागत आहे. 

सध्या शिवाजीनगर व पुणे स्टेशन एसटी स्थानकातून नाशिक, महाबळेश्‍वर, शिर्डी, पणजीकरिता 22 शिवशाही सुटत असून स्वारगेट स्थानकातून 6 शिवशाही बसच्या दिवसभर फेर्‍या होत असल्याची माहिती दै. पुढारीकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे 28 हिरकणी टप्प्याटप्प्याने या मार्गांवरून बंद करण्यात आल्या. एसटीने शिवशाही सुरू करून प्रवाशांच्या माथी मारल्या असून हिरकणीला मात्र बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.  शिवशाहीच्या आणखी 10 गाड्या पुणे विभागात लवकरच दाखल होणार असून अजून काही हिरकणींवर गदा येण्याची दाट शक्यता आहे.