Sat, Jul 20, 2019 22:07होमपेज › Pune › शिवनेरी डिकी अपघात : 'व्होल्वोने करावी ’केस स्टडी’ 

शिवनेरी डिकी अपघात : 'व्होल्वोने करावी केस स्टडी’ 

Published On: Jan 31 2018 5:36PM | Last Updated: Jan 31 2018 5:20PMपुणे: प्रतिनिधी

शिवनेरी बसची डिकी उघडी राहिल्‍याने झालेल्या अपघातात रस्‍त्‍याकडेला उभ्‍या असलेल्‍या दोन व्यक्‍तींचे प्राण गेल्‍याची घटना नुकतीच घडली होती. प्रतिष्ठित व आरामदायी वातानुकूलित असलेल्‍या शिवनेरीच्या सर्व बसेस या व्होल्वो कंपनीच्या आहेत. या अपघातामुळे शिवनेरी बसच्या सुरक्षीतसेसंदर्भात प्रश्न निर्माण होत असल्‍याने शिवनेरीच्या सर्व बसेस व्होल्‍वो कंपनीने तपासून घ्‍याव्यात अशी मागणी पुढे आली आहे.

या अपघातामुळे  व्होल्वो या नामवंत कंपनीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. शिवनेरीची डिकी अचानकपणे उघडणे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असून, व्होल्वो कंपनीने या बसचे उदाहरण केस स्टडी म्हणून घ्यावे, अशी मागणी एसटीचा पुणे विभाग करणार आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवनेरीच्या सर्व डिकी व्होल्वोने तपासून सदोष डिकी असल्यास बस पुन्हा माघारी बोलावून त्यातील दोष दूर करावा, अशी मागणीही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

 दरम्यान, अपघातग्रस्त शिवनेरी बसचा चालक हा परळ डेपोत कार्यरत असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन मेकॅनिकलाना देखील निलंबित केले गेले आहे. या तिघांची खातेनिहाय चौकशी देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त शिवनेरी, अपघाताची जागा (स्पॉट) याची प्रत्यक्ष पाहणी केली असून प्रथमदर्शनी ही मानवी चूकच असल्याचे दिसून येते, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. एसटीच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली असून तांत्रिक चूक असण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र तरीदेखील व्होल्वोने सर्व शिवनेरींची पाहणी करून आम्हाला अहवाल सादर करावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही त्या अधिकार्‍याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले. ज्या प्रमाणे कारचा दरवाजा उघडा राहिल्यास दिवा लागतो, किंवा दरवाजा ऑटोमॅटिक लॉक होतो, तशी सुविधा शिवनेरीमध्ये करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येणार असून सर्व पातळींवर व्होल्वोने शिवनेरींची तपासणी करावी, यासाठी पुणे विभाग आग्रही राहील, अशी माहितीही देण्यात आली.