Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Pune › एव्हरेस्ट यशानंतर शिखर कांचनगंगा मोहिमेचा संकल्प

एव्हरेस्ट यशानंतर शिखर कांचनगंगा मोहिमेचा संकल्प

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:52PMपुणे  : प्रतिनिधी

गिरीप्रेमी संस्थेच्या वतीने अष्टहजारी शिखरांवरील सातवी मोहिम माउंट कांचनगंगा येथे आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ पर्वत, स्वच्छ हिमनदी या ध्येयांतर्गत इको एक्सपेडीशन असे या मोहिमेला नाव देण्यात आले त्याचा शुभारंभ शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे.  एरंडवण्यातील कन्नड संघ सभागृह, डॉ. कलमाडी शामराव प्रशाला, गणेश नगर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एडमंड हिलरी यांच्या साथीने माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवलेले शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व जेष्ठ गिर्यारोहक जामलिंग नोर्गे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

याशिवाय, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त प्रधान सचिव श्री. प्रवीण परदेशी (आयएएस), हावरे इंजिनिअर्स व बिल्डर्सचे सुरेश हावरे, इंडो- शॉटल ऑटो पार्ट्सचे अध्यक्ष विजय पुसाळकर, एअर मार्शल भूषण गोखले, व भारतीय गिर्यारोहण संस्था नवी दिल्लीच्या पश्चिम विभागाचे क्रीडा समितीचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम.पी. यादव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  ही पर्यावरणपूर्वक मोहीम असून ‘स्वच्छ पर्वत, स्वच्छ हिमनदी’ या ध्येयांतर्गत ‘माउंट कांचनगंगा मोहिमे’च्यावेळी चढाई मार्गावर असणार्‍या कचर्‍याची साफसफाई करण्याचे ठरविले आहे.

कांचनगंगा शिखराच्या परिसरामध्ये तब्बल 120 हिमनद्या असून या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतावर खूप मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे या हिमनद्यांची स्वच्छता या मोहिमेचा महत्वाचा भाग असणार आहेत. या कार्यक्रमात जामलिंग नोर्गे त्यांचे गिर्यारोहणाचे अनुभव सांगणार असून आपल्या वडिलांच्या गिर्यारोहणाच्या दैदिप्यमान कामगिरीवर देखील प्रकाश टाकणार आहेत.