Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Pune › देव करो, अन् असलं मरण कुणीही न मरो!

पुणे : बोहल्यावरून उतरताच तिला मृत्यूने गाठले

Published On: May 07 2018 11:29AM | Last Updated: May 07 2018 11:29AMटाकळी हाजी : वार्ताहर

सुखी संसाराची स्‍वप्‍ने पाहात बोहल्यावर चढलेल्या तिचं वधू रुपातील रुपडं पाहून यमाला जाग आली असावी, अशीच काहीशी घटना पुण्यातील शिरुर तालुक्यात घडली. लग्‍न सोहळा झाला आणि वधुची डोली सासरी जाण्याऐवजी थेट स्‍मशानात न्यावी लागली. नववधूला मंडपातच ताप आला आणि रुग्‍णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. म्‍हसे बुद्रुक येथील या हृदयद्रावक घटनेनं अख्‍खं गाव हळहळलं. 

सोलापूर जिल्‍ह्यातील अक्‍कलकोटच्या सख्‍ख्या मावस बहिणींचा विवाह म्‍हसे येथील बबन मुसळे यांच्या दोन मुलांबरोबर ठरला होता. त्यानुसार रविवारी (दि. ६) रोजी दुपारी बारा वाजता दोन्‍ही विवाह थाटात पार पडले. जयश्री हिरामण मुसळे (वय १९) हिचा विवाह हिरामण मुसळे यांच्यासोबत झाला. बोहल्यावरून उतरून वधु-वरांनी एकमेकांना मिठाईचे घासही भरवले. मात्र, पुढे अनर्थ घडला. अचानक जयश्रीला ताप आला आणि चक्‍कर येऊ लागली.

जयश्रीला त्रास सुरू होताच तिला तात्‍काळ शिरूर येथील रुग्‍णालयात हालवण्यात आले. परंतु, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्‍वप्‍ने पाहणार्‍या हिरामनचाही जयश्रीच्या निधनाने स्‍वप्‍नभंग झाला. 

ही घटना समजताच नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी गर्दी केली. नववधुच्या रुपात जयश्रीचा मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला.