Fri, Mar 22, 2019 01:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › प्रशासनाने वंचितांच्या आयुष्यात कविता फुलवावी

प्रशासनाने वंचितांच्या आयुष्यात कविता फुलवावी

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:03AMपुणे : प्रतिनिधी 

प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. त्यांनी आपण जनतेचे प्रतिनिधी असून आपण समाजातील वंचितांचे, दुर्लक्षितांचे प्रश्‍न सोडवायला या पदावर काम करीत आहोत. त्याचबरोबर प्रशासनातील संवेदनशिल व्यक्तींनी त्यांच्या प्रशासकीय अधिकाराचा उपयोग करुन समाजातील तळागाळातील घटकातील समाजात कवितांचे मळे फुलवावेत, असे मत माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि बुकगंगा पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सतीश ज्ञानदेव राऊत यांच्या ‘पाझर हृदयाचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, कवी अरुण शेवते आणि बुकगंगा पब्लिकेशन्सचे मंदार जोगळेकर उपस्थित होते.  यावेळी शरद पवार म्हणाले, आताच्या काळात नवोदित कवींच्या कवीतेत धग पाहायला मिळते. मी सतत नवोदित कवींच्या शोधात असतो. मर्ढेकर आणि तांबे श्रेष्ठकवी होतेच पंरतु अलिकडील नवोदीत आणि बंडखोर कवी ज्या प्रकारे समाजातील उपेक्षितांच्या आणि वंचितांचे दुःख मांडत आहे त्यावरुन साहित्याला दिशा मिळत आहे.

राऊत यांच्या सारख्या कवींनी प्रशासकीय अधिकार्‍यांमधील संवेदनशीलता जपत समाजातील पिडीतांचे, दुःख त्यांच्या साहित्यरुची नुसार कविता, कथा-कांदबर्‍या आदी साहित्य प्रकारातुन मांडावे, असेही पवार म्हणाले.  बंडखोर कवींची कवीता ही हेलावून आणि हादरून ठेवते. विचार करायला प्रवृत्त करते. राऊत यांनी लिहिलेल्या छावणी, निवडणूक, दुष्काळ या कवीतांवरुन  सर्वसामान्याचे दुःख हे यांच्या कवितांचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांची कवीता वाचल्यावर लक्षात येते. आमच्या सारख्या सार्वजनीक जीवनात वावरणार्‍यांच्या आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा अनेक प्रसंगात काव्य दडलेले असते. चर्मकार, भटक्या-विमुक्त जातीतील अनेक कवी पुढे येऊ पाहत आहेत, हे आशादायी चित्र असल्याचेही पवार म्हणाले. 

यावेळी अक्षयकुमार काळे म्हणाले, मराठी साहित्यात श्रेष्ठ काव्य म्हणुन सामाजिक कवीतांना स्थान मिळालेले आहे. प्राचिन काव्याच्या पंरपरेत पाहिलेतरी आपणांस हेच काव्य श्रेष्ठ असल्याचे पुरावे मिळतात. आधुनिक कवी देखील संतांच्या सामाजिक पंरपरेतून येणार्‍या कवीतांपुढे नतमस्तक झालेले दिसून येतात. संत परंपरेतून आलेल्या काव्यात देखील सामाजिक काव्य असल्याने ती कवीता चिरकाल आहे, असे काळे म्हणाले.