पुणे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे सात ट्रक सुरक्षा रक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच सेवक चाळीतील दर्ग्यासमोर हा राडारोडा टाकण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तर गेल्या सात दिवसांपासून हा प्रकार घडत असून, गोखलेनगरमधून हा राडारोडा या ठिकाणी आणला जात असून, याकडे विद्यापीठातील कोणाचेच लक्ष नसल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. या प्रकाराने विद्यापीठात खळबळ उडाली असून, याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे; तसेच याची चौकशी करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दुपारी अचानक राडारोडा भरलेले सात ट्रक एकापाठोपाठ एक आले. गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या ट्रकचालकांकडे चौकशी केली असता सेवक वसाहतीमध्ये हा राडारोडा टाकण्यासाठी सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा राडारोडा टाकण्यास कुणी सांगितले आहे. याची विचारणा केली असता त्या ट्रकचालकांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे सर्व सात ट्रक चालकांना अधिक चौकशीसाठी सुरक्षा विभागाच्या मुख्य कार्यालयात घेऊन जाण्यात आले. सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांनी स्थावर विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही राडारोडा मागविला नसल्याचे तसेच त्या सात ट्रकशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता विद्यापीठातीलच एका कर्मचार्याने पैसे घेऊन हा राडारोडा टाकण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.