होमपेज › Pune › तंबाखूजन्य पदार्थाच्या सर्रास विक्रीचा परिणाम

तंबाखूजन्य पदार्थाच्या सर्रास विक्रीचा परिणाम

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:45PMपुणे : अपर्णा बडे

राज्यात गुटख्यासह इतर तंबाखूजन्य पदार्थ, सुंगधी सुपारीच्या उत्पादन व विक्रीवर प्रतिबंध असतांनाही राज्यात मोठ़या प्रमाणावर त्याची विक्री होतांना दिसते.’ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे-2017’(गॅट्स)च्या माहितीनुसार, देशात एकूण 28.6 टक्के मुखाचे कर्करोगाचे रुग्ण असून महाराष्ट्रात मुखाच्या कर्करुग्णांचे प्रमाण 26.6 ट्क्के इतके आहे. मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नागपूर, पुणे, मुंबई ही शहरे बरेच वरच्या क्रमांकावर असल्याचे लक्षात आले आहे. 

शासनाने राज्यातील नागरिकांच्या हिताकरिता कोट़यवधींच्या महसुलावर पाणी सोडून, राज्यात  गुटखा, पानमसाल्यासह बर्‍याच तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन व विक्रीवर प्रतिबंध घातला आहे. मात्र याची अंमलबजावणी होत नाही.  या पदार्थाची उत्पादन व विक्री हा गुन्हा असतांनाही राज्यात विविध जिल्ह्यात, शहरात  काही व्यवसायिकांकडून त्याची सर्रास विक्री होतांना दिसते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी या व्यावसायिकांवर कारवाई होत असली तरीही या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीसह सेवनावर शासकीय यंत्रणांना अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. दरम्यान महाराष्ट्रात  पुरुष कर्करुग्णाचे प्रमाण अधिक आढळत असल्याचे वेगवेगळ्या सर्वेक्षणातून लक्षात आले आहे.

सर्वेक्षणातील अभ्यासात आढळणार्‍या प्रत्येक 100 कर्करुग्णांपैकी 30 ते 35 रुग्णांना मुखाचा कर्करोग असल्याचे निदर्शनास येत आहे. मुखाच्या कर्करोग रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्याही  10 ते 12 ट्क्के इतकी आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर  बंदी असली तरी अनेक ठिकाणी पानठेले व पान टपरी व्यावसायिक अशा पदार्थांची विक्री  राजरोस करतात. या अशा पदार्थांचे सेवन हजारो लोक करीत असल्याने ही वेळ आली आहे. राज्यात  मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांसह प्रतिबंधित वस्तूंची विक्री पूर्णपणे थांबवण्याची गरज असल्याचे लक्षात येत आहे. दरवर्षी भारतामध्ये तोंडाच्या व घशाच्या कर्करोगाचे अंदाजे 85000 पुरुष  व 34000 स्त्री असे नवे रुग्ण आढळतात.

यापैकी 90 ट्क्के रुग्ण हे तंबाखूसेवनामुळे झालेल्या कर्करोगाचे आहेत. जे टाळता येणे शक्य आहे. यासाठी तंबाखूविरोधी जनजाग़ृती आवश्यक आहे.अशी जनजाग़ृती राज्यात वाढत आहे  ही  खुप सकारात्मक बाब आहे. शाळांमध्ये अशा प्रकारची जनजाग़ृती वाढली असून विद्यार्थी व्यसनाधीन होणर नाहीत याकडे  लक्ष दिले जात आहे. याचा परिणाम म्हणजे भविष्यात मुखाच्या व घशाचे कर्करोगाच्या रुग्णाचे प्रमाण अत्यल्प असेल.

- डॉ. नीता घाटे, कान-नाक-घसा तज्ञ