Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Pune › कात्रजमध्ये सुरक्षारक्षकाची निर्घृण हत्या

कात्रजमध्ये सुरक्षारक्षकाची निर्घृण हत्या

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:57AMपुणे :प्रतिनिधी

कात्रज जुन्या बोगद्याजवळ एका शोरूमच्या सुरक्षारक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी घातक हत्याराने गळ्यावर व चेहर्‍यावर वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. दरम्यान सुरक्षारक्षकावरील हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देेशाने आलेल्यांनीच त्याचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  आरीफ कासम पठाण (वय 45, रा. कात्रज) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ आयशर कंपनीची वाहन दुरुस्ती करण्याची ‘प्रॉमिस ऑफ पॉवर अँड प्रॉफिट’ ही मोठी शोरूम आहे. याठिकाणी आरीफ पठाण हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. ते रात्र पाळीला येथे येत असत. दरम्यान, पठाण हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे येथे आले. परंतु, रविवारी दुपारी बारा वाजल्यानंतरही आरीफ पठाण हे घरी आले नाहीत. तसेच त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी येथे आला. त्यावेळी त्याला गेटवर रक्ताचे डाग दिसले. त्याने शोध घेतला असता, येथील कॅन्टीनमध्ये एका पत्र्याच्या खाली पठाण यांचा मृतदेह ठेवलेला आढळून आला.

मुलाने तत्काळ आईला फोन करून माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी केलेल्या तपासात पठाण हे रात्री एका दारूच्या दुकानात आल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तर त्यानंतर त्यांनी रात्री आकरा वाजता पत्नीला फोन केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने शोरूममध्ये घुसलेल्या चोरट्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी पठाण यांचा खून केला असावा, तसेच मृतदेह ओढत नेऊन लपविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पठाण यांचा मोबाईल व दुचाकीची चोरी झाली आहे.  पोलिसांनी अनेक शक्यता वर्तवल्या असल्या तरी पठाण यांच्या खुनामागील ठोस कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.