होमपेज › Pune › सनईच्या सुमधूर सुरांनी ‘सवाई’ची मंगलमय सुरुवात

सनईच्या सुमधूर सुरांनी ‘सवाई’ची मंगलमय सुरुवात

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:46AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मंगलमय सुरांनी सजलेले ज्येष्ठ सनई वादक मधुकर धुमाळ यांचे सनईवादन..., वातवरणात आनंदाची अनुभूती निर्माण करणारे पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य डॉ. विजय राजपूत यांचे सुरेल गायन..., चतुरंगी वादनातून देबाशीष भट्टाचार्यांनी द्विगुणित केलेला  स्वरमई आनंद आणि एकापेक्षा एक बहारदार सरस बंदिशींचा रंगमंचावर बरसणारा स्वरांचा पाऊस, अशा रमणीय वातावरणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास प्रारंभ झाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे 65 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाप्रसंगी किराणा घराण्याशी जवळीक असणारे बाळासाहेब मिरजकर यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळाला कर्नाटक, मंगळवेढा परिसरात सापडत असलेल्या रेड सँण्डल या दुर्मिळ लाकडापासून तयार केलेले 4 तानपुरा भेट दिले. दुपारी दोन वाजेपासूनच न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या परिसरात रसिकांनी जमण्यास सुरुवात केली होती.

भव्य मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वरमंचावरून सादर होणारा कलाविष्कार आणि कलाकारांच्या भावमुद्रा सुस्पष्टपणे पाहायला मिळाव्यात, यासाठी मोठ-मोठ्या स्क्रीन बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतीय बैठक व्यवस्थेमध्ये बसलेल्या रसिकांना कलाकारांच्या भावमुद्रा सुस्पष्टपणे टिपता येत होत्या. महोत्सवातील पहिले सत्र दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. सुरूवातीला दिवंगत कलाकारांना महोत्सवाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. मधुकर धुमाळ यांनी सनई वादनाच्या माध्यमातून राग ‘भिम पलास’ ने  सुरुवात केली. सुमारे पाऊणतास त्यांनी या रागाचे सौंदर्य उलगडून दाखविले आणि रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या धून वाजवून मैफलीची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), ओंकार धुमाळ आणि विजय बेल बन्सी (सुरशहनाई) साथ लाभली. धुमाळ यांनी सनईचे सप्तसुर उधळून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य ख्याल गायकीसाठी प्रसिध्द असणारे शास्त्रीय गायक डॉ. विजय रजपुत यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी राग ‘पुरिया कल्याण’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. ‘पुरिया कल्याण’ राग उलगडताना त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर त्यांनी होरीचे सादरीकरण करत दादरा तालात राग ‘पिलू’ सादर केला. दादरा ताल सादर करताना त्यांनी अनेक बहारदार बंदिशींची पेशकश केली. यात त्यांनी पेश केलेल्या मोरे शाम..., अब अवनकी प्रिया मिलन की..., मोरे कान्हा आये जो पलटके... या बंदिशींच्या सुमधूर स्वरात रसिक श्रोते न्हाऊन निघाले. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या रघुवर तुमको मेरी लाज या भजनाच्या सादरीकरणाने परिसर भक्तीमय झाला. उत्तरोत्तर त्यांची मैफल रंगत गेली. त्यांना रविंद्रकुमार सोनी (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), इंग्लंड येथील संगीत प्राध्यापक एव्हीड क्लार्क (तानपुरा) यांनी साथसंगत केली. गौरी पठारे यांच्या गायनाने पहिल्या सत्राची सांगता झाली. यावेळी कला सादर करणार्‍या कलाकारांचा श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जागतिक किर्तीचे गिटार वादक देबाशिष भट्टाचार्य यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी स्वरमंचावर वयाच्या चौदाव्या वर्षी स्वत: तयार केलेले चतुरंगी या वाद्याचे सादरीकरन केले. 6 किलो वजन असलेल्या या चतुरंगी वाद्याला 6 मुख्य तारा आहेत. त्यांनी चतुरंगीचे झप ताल आणि तीन तालात वादन करत राग ‘मधुवंती’ उलगडला. यात त्यांनी पेश केलेल्या ‘बाजे मुरलिया बाजे’ या धुनेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यांना शुभाशिष भट्टाचार्य (तबला), अखिलेश गुंदेचा (पखवाज) अशी साथसंगत लाभली. आजारावर मात करत सवाईसाठी पुन्हा सज्ज

स्वदेशी, लगान चित्रपटाला संगीत दिल्यानंतर मला कॅन्सरचा आजार झाला. सुमारे सहा महिने डॉ. सुल्तान प्रधान यांचे माझ्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे माझे सनई वादन अक्षरश: बंदच झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांचा उपचार पूर्ण केल्यानंतर मी पुन्हा उभारी घेतली. मात्र, पुन्हा उभारीची शक्यता कमीच होती. तरीसुध्दा जिद्द  सोडली नाही. आजारावर मात करत पुन्हा सवाईत सनईवादन केले. हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. - मधुकर धुमाळ, सनई वादक