Mon, Jun 17, 2019 03:21होमपेज › Pune › संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती शक्य?

संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती शक्य?

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:24AMपुणे : निमिष गोखले

पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकातून बस बाहेर काढत बेदरकारपणे चालवून रस्त्यामध्ये येईल त्याला चिरडणार्‍या संतोष माने प्रकरणाला दि. 25 जानेवारी रोजी तब्बल सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या घटनेत दहा जण मृत्युमुखी पडले तर तीसच्या वर जखमी झाले होते. पुणेकर अद्यापही तो कटू प्रसंग विसरलेले नसून त्या दिवशी तो थरारक अनुभव घेणार्‍यांना आजही मनात धडकी भरते. असे असूनही एसटी प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसून येत नसून येत्या काळात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होणे सहज शक्य असल्याचे वास्तववादी व धक्कादायक चित्र सद्यःस्थितीवरून दिसत आहे.

सध्या स्वारगेट एसटी स्थानकात सातारा रस्त्यावरील गेटमधून एसटी आत व बाहेर जात असून, शंकरशेठ रस्त्यावरून फक्त बाहेर पडतात. माने प्रकरणानंतर स्वारगेट येथील एण्ट्री व एक्झिट गेट या दोन्ही ठिकाणी सेफ्टी गेट बसवून बसचा नंबर, त्याची नोंदणी, येण्या-जाण्याची वेळ, चालकाची सही घेण्याची जबाबदारी कर्मचार्‍यांवर सोपविणार असल्याचे एसटी प्रशासनाने जाहीर केले होते. एप्रिल 2012 मध्ये इलेक्ट्रॉनिक बूम बॅरिकेड्स बसविण्याचे आश्‍वासन एसटीच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचे दिसून आले. स्वारगेट स्थानकातील सातारा रस्ता बाजूकडील प्रवेशद्वारात लोखंडी गेट 2012 मध्ये बसविण्यात आले होते.

मात्र, दरवेळीप्रमाणे याही वेळी अपघात घडून गेल्यानंतर काही दिवसांनी सर्वच जण त्याचे गांभीर्य विसरून गेले व 2-3 महिन्यांनी हे गेट काढून टाकण्यात आले. आजमितीस ते गेट धूळखात पडून असून, येणार्‍या-जाणार्‍या एसटींची कोणतीही नोंदणी येथे होत नाही. सुरुवातीला बटणाने ऑपरेट करता येतील, असे इलेक्ट्रॉनिक गेट बसविण्यात येणार होते. मात्र, स्वारगेट स्थानकात दर मिनिटाला पाच बस ये-जा करत असल्याने जादा मनुष्यबळाची आवश्यकता भासू शकते, या विचारातून टोलवर जे ऑटोमॅटिक बूम बॅरिकेड्स बसवितात, तसेच बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिला असून, यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

सद्यःस्थितीत स्वारगेट स्थानकात सुमारे दोन हजार बसची दररोज ये-जा सुरू असते व एक लाख प्रवासी प्रवास करतात. या सर्वच प्रवाशांची सुरक्षितता एसटी प्रशासनाने वार्‍यावर सोडली असून, सुरक्षा रक्षकांचाही पत्ता नसल्याने “एसटी प्रशासना, तुला प्रवाशांच्या जिवाची पर्वा नाय काय..?’’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. दरम्यान, एसटीतील काही अधिकारी, गेटची गरजच काय, असे बेजबाबदार उत्तर देत असून प्रशासनाला प्रवाशांची किती काळजी आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.


ऑटोमॅटिक बूम बॅरिकेड्सचे कार्य काय? 

स्थानकातून बाहेरगावी जाणार्‍या बसच्या नंबर प्लेटचा फोटो स्कॅन करणे, बसचे वेळापत्रक फीड करणे व त्यानुसार बस गेट बाहेर जात आहेत का, हे पाहणे हे कार्य ऑटोमॅटिक बूम बॅरिकेड्स करतात. त्याचबरोबर एखाद्याने बस चोरी करून नेण्याचा प्रयत्न केल्यास वेळापत्रकाच्या आधीच किंवा नंतर ती बस बाहेर पडल्याने हे बूम बॅरिकेड्स उघडणार नाहीत. या बूम बॅरिकेड्सवर बस आदळविण्याचा प्रयत्न झाल्यास ते दणकट असल्याने तुटणार नाही. बसचे मात्र किरकोळ नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर स्थानक परिसरात शिरकाव करणारी खासगी वाहने आतमध्ये येऊच शकणार नाहीत, असा त्याचा उपयोग आहे.

समुपदेशकाची नेमणूक नाहीच

संतोष माने प्रकरणानंतर कर्मचार्‍यांचे मानसिक संतुलन चांगले रहावे यासाठी गेल्या पंधरवड्यापूर्वी  राज्य परिवहन महामंडळातर्फे संपूर्ण राज्यात समुपदशेकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने हालचालीसुद्धा सुरू झाल्या होत्या. परंतु  अद्यापपर्यंत कोणत्याही समुदपदेशकाची नेमणूक करण्यात आली नाही. वास्तविक या जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, त्यांना देण्यात येणारे मानधन केवळ चार हजार रुपये असल्याने कोणताही समुपदेशक येण्यास तयार होईना.


महिनाभरात सेफ्टी 

गेट बसवू स्वारगेट एसटी स्थानकात नुसते गेट बसवून उपयोग होणार नाही, तर हा प्रयोग यशस्वी ठरतो का, हे पाहणे देखील गरजेचे आहे. नुसते पाच-सहा हजार रुपये घालवून उपयोगाचे नाही. महिनाभरात सर्व बाबींचा विचार करून सेफ्टी गेट बसविण्यात येईल.
  

 -श्रीनिवास जोशी, विभागीय  वाहतूक व्यवस्थापक