Thu, Jun 20, 2019 20:54होमपेज › Pune › संक्रांतीमुळे तीळ, गुळ,बाजरीची मोठी उलाढाल

संक्रांतीमुळे तीळ, गुळ,बाजरीची मोठी उलाढाल

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:40AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नववर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्राती सणाच्या पार्श्‍वभुमीवर गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात तीळ, गुळ आणि बाजरीला मागणी वाढल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने डिसेंबरच्या सुरवातीस चिक्की गुळाचे वाढलेले दर शेवटच्या आठवड्यात 500 ते 600 रुपयांनी घटले. दरम्यान, आवक कमी असल्याने तीळाचे दर प्रतिकिलोमागे 20 ते 25 रुपयांनी वधारले होते. तर, बाजरीची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.  मकर संक्रांतीसाठी तीळ, बाजरी आणि गुळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात दरवर्षी चिक्की गुळाला मोठी मागणी असते.

यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तीळ पापडी, वड्या, लाडू करण्यासाठी कारखानदार, लघुउद्योजकांप्रमाणेच गृहिणींकडून चिक्की गुळाला मागणी वाढली होती. परिणामी, दरात वाढ होऊन चिक्की गुळाच्या प्रतिक्विंटल ढेलीला 4 हजार ते 4 हजार 400 रुपये आणि बॉक्स पॅकींग गुळाला 4 हजार 400 ते 5 हजार रुपये दर मिळाला. गतवर्षीप्रमाणे चिक्की गुळाला यंदाही चांगली मागणी होती. राज्यातील कराड, पाटण, सांगली, निरा, केडगाव आदी भागातून प्रतिदिन 1 हजार ढेली व 700 ते 800 बॉक्स चिक्की गूळ बाजारात दाखल होत होता. त्याला पुण्यासह ठाणे व नाशिक जिल्ह्यातून मोठी मागणी होत होती. मात्र, डिसेंबर अखेर पासून मागणी घटल्याने गुळाचे दरात 500 ते 600 रुपयांनी घटल्याचे गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले. 

परदेशासह देशात तिळाच्या उत्पादनात 25 टक्क्यांनी घट झाल्याने दरात प्रतिकिलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे. संक्रांतीमुळे तिळाचे वाढलेले दर स्थिर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर 20 ते 25 रुपयांनी जास्त असून राज्यभरातून तिळाला मागणी होत आहे. सध्यस्थितीत बाजारात गावरान तीळाची 120 रुपये तर हल्ड तिळाची 140 रुपये प्रतिकिलोने विक्री होत असल्याचे अजित बोरा यांनी सांगितले. संक्रांतीनंतर 15 दिवस तिळाला मागणी कमी राहिल. त्यानंतर फेब्रुवारीनंतर मागणी वाढेल.