Sat, Apr 20, 2019 17:56होमपेज › Pune › समाजबंध च्या जाणिवेतून आशा पॅड ची निर्मिती

समाजबंध च्या जाणिवेतून आशा पॅड ची निर्मिती

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:08AMपुणे :समीर सय्यद 

समाजबंध ही सामाजिक संस्था महिलांचे आरोग्य, पर्यावरण, कपड्यांचा पुनर्वापर आणि स्वयंरोजगार या घटकांवर काम करत आहे. जुने कपडे जमा करून त्यांच्यावर प्रक्रिया करत पर्यावरणपूरक कापडी ‘सॅनिटरी पॅड’ बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. ‘आशा पॅड’ असे नामकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षणासह मोफत पुरविले जाणार आहे. त्यामुळे समाजबंधच्या सामाजिक जाणिवेतून ‘आशा पॅड’चा उदय झाला आहे. 

आपण समाजाचे देणे लागतो, याची जाणीव खूप कमी लोकांना असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ लोकांसाठी काम करणारे काही व्यक्ती आणि संस्था आहेत. मात्र, काही संस्था लोकांच्या नावाखाली आपला स्वार्थ साधणार्‍या ही आहेत. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून गरजू लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ‘समाजबंध’ने सुरु केला आहे. यातून केवळ दिखावा नाही, तर विधवा महिलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. घटस्फोटित महिलांचा पुनर्वसन प्रकल्प पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे सुरू केला आहे. या ठिकाणी काम करणार्‍या घटस्फोटित तरुणीच्या हस्तेच प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.     

घटस्फोटित महिलांचे प्रश्न वेगळे असतात. त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासोबतच मानसिक आणि सामाजिक स्थैर्य या घटकांवर काम करण्याची गरज असते. म्हणूनच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना रोजगार देण्याबरोबरच त्यांचा पूर्वायुष्यात गेलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत मिळवून देणारा हा प्रकल्प असेल, असा विश्वास ‘समाजबंध’चे समन्वयक सचिन आशासुभाष यांनी व्यक्त केला आहे.

माझ्या स्वतःच्या आईला गर्भाशयाचा संसर्ग झाल्याने खूप कमी वयात तिचे गर्भाशय काढावे लागले. गर्भाशयासारखा महत्त्वाचा अवयव काढल्याने महिलेची शारीरिक झिज तर होतेच, पण मानसिक आरोग्यावर ही त्याचे दुष्परिणाम होतात, हे मी स्वतः घरी अनुभवले आहे. ग्रामीण भागात गर्भाशयाच्या शस्त्रकियेचे खूप मोठे रॅकेट आहे, ज्याचे दुष्परिणाम महिलांना नंतर आयुष्यभर सोसावे लागतात. ते होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे.
  

 - सचिन आशा सुभाष, सन्मवयक, समाजबंध,पुणे.


ठळक मुद्दे  

 या महिला सहा तास ‘समाजबंध’सोबत काम करतील तर उरलेले दोन तास ‘समाजबंध’ त्यांच्या व्यक्तिमत्वावर काम करणार आहे. ज्यामध्ये विविध व्यावसायिक कला, संभाषण कौशल्य, इंग्रजी, घरगुती उद्योग इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.   

ज्या महिला अजूनही साध घरगुती कापड वापरतात अशांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना प्रशिक्षणासह ते मोफत दिले जाणार आहे. त्याची सुरुवात मुळशी तालुक्यापासून करुन हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राभर विस्तार केला जाणार आहे. 

 जे कपडे पुन्हा वापरण्यायोग्य नाहीत अशा कपड्यांपासून प्लास्टिक पिशवीला पर्यायी आकर्षक आणि मजबूत कापडी पिशव्या तयार केल्या जाता आहेत. या प्रकल्पात तयार होणार्‍या कापडी पॅडला ‘आशा पॅड’ हे नाव देण्यात आले.