Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Pune › आरोग्य विभागाला डॉक्टर सापडला, पोलिसांकडून मात्र फरार घोषित

आरोग्य विभागाला डॉक्टर सापडला, पोलिसांकडून मात्र फरार घोषित

Published On: Mar 14 2018 9:10PM | Last Updated: Mar 14 2018 9:10PMपुणे :प्रतिनिधी

फुले, हळद-कुंकू यांचा उतारा करून मांत्रिकाद्वारे ‘उपचार’ करायला लावणारा डॉ. सतीश चव्हाण व मांत्रिक पोलिसांनी फरार झाल्याचे जाहीर केले खरे. पण महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी त्याचा जबाब नोंदवला आहे. जर आरोग्य विभागाला डॉ. चव्हाण सापडत असेल तर तर पोलिसांना तो का मिळून येत नाही असा प्रश्‍न त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

संध्या सोनवणे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन वैद्यकिय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी सकाळी डॉ. चव्हाण याचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांचा जबाब त्यांच्याच नर्सिंग होममध्ये नोंदवला आहे. 

संध्या यांचा मृत्यू होण्यापूर्वी खाजगी डॉक्टर सतीश चव्हाण याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला परस्पर घेऊन येत मांत्रिकोपचार केला असल्याचे पुरावे नातेवाईकांनी दिले. तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याची दखल घेत पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी उपचाराबाबत काही दिरंगाई झाली आहे का याची चौकशी करण्यात यावी असे लेखी पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले.

त्यानुसार आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक पखाले व परवाना विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी नाईक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन संध्या यांची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली व त्यांचे अवलोकन केले. त्यानुसार त्यांनी बुधवारी डॉ. चव्हाण याचा जबाब सकाळीच त्यांच्या स्वारगेट चौकातील रुग्णालयात नोंदवला. 

आणखी दोन डॉक्टर रडारवर

आरोग्य विभागाने संध्या यांच्या उपचारांच्या कागदपत्रांची चौकशी केली असता संध्या यांनी शहरातील आणखी दोन डॉक्टरांकडे उपचार घेतले असल्याचे आढळून आले आहे. म्हणून यामध्ये त्या डॉक्टरांचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संध्या यांचा मृत्यू  नेमका कशामुळे झाला याची चौकशी त्याबाबत करण्यात येणार आहे. तसेच या डॉक्टरांनी बरोबर उपचार केले का याचीही चौकशी करण्यात येणार आहे. येत्या आठवडयाभरात ही तपशीलवार चौकशी पूर्ण होणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.