Sat, Feb 23, 2019 22:48होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाच्या ‘रन-वे’चा मार्ग मोकळा

पुरंदर विमानतळाच्या ‘रन-वे’चा मार्ग मोकळा

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:10AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित असणार्‍या विमानतळास हवाई दलाने मान्यता दिली आहे; त्यामुळे विमानतळाच्या ‘रन-वे’(धावपट्टी)चा  मार्ग मोकळा झाला असून, लवकरच विमानांचे टेकऑफ होणार आहे; त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विमानतळाबाबतचे ‘भिजत घोंगडे’ संपुष्टात आले आहे. दरम्यान अल्पावधीतच विमानतळाच्या बांधकामास सुुरुवात केली जाणार आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसेंदिवस दळणवळण वाढत चालले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. दरम्यान जिल्ह्यातील पुरंदर येथे उभारण्यात येणार्‍या विमानतळाच्या ‘रन-वे’बद्दल (धावपट्टी) हवाई दलाने हरकत घेतली होती.

त्यानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हवाई दलाने स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे विमानतळ उभारणीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. हवाई दलाच्या हरकतीनंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रस्तावित विमानतळ आराखड्यात दोन वेळा बदल करून प्रस्ताव सादर केला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नव्याने दाखल केलेल्या आराखड्यावर हवाई दलाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ उभारणीला गती मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर येथे विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार विमानतळासाठी जमीन संपादित करताना शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी चार पर्याय ठेवण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 2 हजार 400 हेक्टर जागा विमानतळाच्या उभारणीसाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या उभारणीसाठी राज्य शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने सकारात्मक अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने कामाला गती मिळणार आहे.