Thu, Jun 27, 2019 16:32होमपेज › Pune › एक मार्ग बंद तर दुसरा दिवसाच सुरु

एक मार्ग बंद तर दुसरा दिवसाच सुरु

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:28AM

बुकमार्क करा

पुणे : नेहा सराफ 

शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील भुयारी मार्ग बंद करण्यात आला असून सातारा रस्त्यावरील मार्ग नागरिक निगा राखायला कोणी नसल्याने रात्री अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंद करतात. त्यामुळे केवळ सुरु असलेले मार्ग अस्वच्छ आणि अंधारात ठेवणेच नव्हे तर बंद करण्याचा पराक्रमही शहर प्रशासनाने केला आहे. 

नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे जावे आणि रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून भुयारी मार्गाची योजना केली जाते. त्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्चही करते. पण त्या भुयारी मार्गांना टाळे लावून नागरिकांचा कररुपी पैसा वाया गेल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. शहरातील केवळ कोथरूड आणि कर्वेनगर- वारजे भागातील नव्हे तर उर्वरित भागातीलही बहुतांश भुयारी रस्ते शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे भुयारी रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेला नेमक जबाबदार कोण, असा सवाल विचारण्याची गरज आहे. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर मॉडर्न कॉलेज चौकात असलेल्या जी. एम. भोसले चौकातील भुयारी मार्गाला तर कुलूप लावले आहे. आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी तर गेले पाच महिने हा मार्ग बंद असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणावर वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह अनेक वयोवृद्ध व्यक्तीही रस्ता ओलांडत असतात. पण भुयारी मार्गालाच टाळे असल्याने त्यांना वाहनांमुळे अडथळ्यातूनच मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही.  तयार केलेला मार्ग बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय मात्र अत्यंत चुकीचा असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

दुसरीकडे सातारा रस्त्यावर असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भुयारी मार्गात पानाच्या पिचकार्‍यांच्या जागोजागी खुणा आहेत.इतकेच नव्हे तर या मार्गाची निगा आजूबाजूचे नागरिक ठेवत असून काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हा मार्ग रात्री उशिरा बंद ठेवला जातो, असेही सांगण्यात आले. 

या मार्गातील एक प्रवेशद्वार रहदारीच्या मध्यवर्ती ठिकाणी उघडत असल्याने ते कायमस्वरूपी बंद असते. त्यामुळे मार्गाची रचना करताना हा विचार का केला गेला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.