Wed, Jul 24, 2019 06:10होमपेज › Pune › धार्मिक चालीरीतीत गुरफटलेल्या विवाहितेला दिलासा

धार्मिक चालीरीतीत गुरफटलेल्या विवाहितेला दिलासा

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:44AMपुणे : महेंद्र कांबळे 

आंतरजातीय विवाह केल्यानंतर उच्चशिक्षित पत्नीवर धार्मिक चालीरीती पाळण्याची बंधने घालून कौटुंबिक हिंसाचार करणार्‍या पतीला पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  लग्नानंतर धार्मिक चालीरितीमध्ये गुरफटलेल्या विवाहितेला न्यायालयाकडून पोटगी मंजूर झाल्याने तिला काहीअंशी  दिलासा मिळाला आहे.  विवाहितेने तक्रार दाखल केल्यापासून पाच हजारांची पोटगी आणि भाडे स्वरूपात पतीने पाच हजार द्यावे. तसेच तिचा कोणत्याही प्रकारे कौटुंबिक छळ न करण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.   दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी एकमेकांची साथ न सोडण्याच्या आणाभाका घेतल्या. भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल याचा विचार न करता त्यांनी आंतरजातीय विवाह केला.

लग्नाच्या काही दिवसानंतरच महाराष्ट्रीयन समाजात वावरलेली विवाहिता जेव्हा भिन्न सामाजिक चालीरीती असलेल्या सासरी नांदायला गेली तेव्हा तिला सर्व गोष्टी नवीन होत्या. तिच्या सासरच्यांनी तिचा पूर्णपणे स्वीकार केला नाही. काही दिवसातच तिचा छळ सुरू केला. आश्‍चर्याची बाब म्हणजे उच्चशिक्षित असलेली विवाहिता आई होत नसल्याने मूल होण्यासाठी सासरच्यांनी तिला त्यांच्या धार्मिक व्यक्‍तीने ‘मंतरलेेले’ फळ खाण्यास दिले. काही दिवस तिने निमूटपणे छळ सहन केला. परंतु, तिच्यावरील अन्याय थांबता थांबत नव्हता. एकेदिवशी तिच्या पतीने तिला जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर तिने माहेर गाठले आणि अखेर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊन सासरच्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला.

दाव्यामध्ये तिने पतीकडून एक लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली.  तिने केलेले आरोप चुकीचे असल्याचे न्यायालयाला सांगताना पतीने तिच्या मागण्यांना विरोध केला. त्याने स्वतःचा बचाव करताना आरोपही नाकारले. तिला आलिशान आयुष्य जगायचे होते, स्वतः घरातील काम न करता घरकाम सासरच्यांनी करावे अशी तिची अपेक्षा होती. ती सातत्याने माहेरी जाऊन राहायची, तिला चांगल्या पगाराची नोकरी असून तिचा अर्ज फेटाळण्याची मागणी त्याने न्यायालयाकडे केली. न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिने दाखल केलेल्या दाव्यावर विवाहितेच्या बाजूने अंतरिम आदेश देताना पती हा पत्नीची जबाबदारी नाकारू शकत नसल्याचे नमूद केले. तसेच तिला पोटगी आणि भाडे स्वरूपात एकूण दहा हजार रुपये देण्याचा आदेश दिला. दरम्यान, तिच्या संरक्षणाचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.