Thu, Jul 18, 2019 02:12होमपेज › Pune › पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदासाठी फेरजाहिरात

पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदासाठी फेरजाहिरात

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:08AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

शहराच्या नवीन आरोग्यप्रमुखासाठी पुणेकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण पुणे महापालिकेने या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीत केवळ दोनच उमेदवार पात्र ठरले. यामुळे शासकीय नियमानुसार ही जाहिरात रद्द करण्यात आली असून, त्यासाठी पुन्हा फेरजाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहराचा आरोग्यप्रमुख हे वर्ग ‘अ’ चे वैधानिक पद भरण्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 18 ऑगस्ट रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार या पदासाठी शहर व राज्यातून 25 अर्ज आले होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, पद या निकषांत बसणार्‍या केवळ दोन अधिकार्‍यांचीच मुलाखत घेण्यात आली होती. उरलेले 23 उमेदवार निकषांत न बसल्याने त्यांची मुलाखत घेण्यात आली नाही.   

यामध्ये  राज्य  साथरोग विभागाचे (फिलेरिया) सहायक संचालक  डॉ. बाळकृ ष्ण कांबळे तर  सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हानकारे हे दोन उमेदवार पात्र ठरले होते.  शासकीय नियमानुसार कोणत्याही भरतीसाठी तीन व त्यापेक्षा अधिक उमेदवार असणे आवश्यक आहे. येथे मात्र दोनच उमेदवार पात्र ठरल्याने ही भरती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त अनिल मुळे यांनी एक परिपत्रक प्रसिध्द केले आहे. ‘आरोग्य अधिकारी हे पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण 25 अर्जापैकी फक्त दोन अर्ज पात्र झाल्याने मुलाखतीसाठी आवश्यक व पुरेशी स्पर्धा झाली नाही.  त्यामुळे पात्र झालेल्या दोन उमेदवारांना गुणदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी या पदाची जाहिरात रद्द करण्यात आली असून फेरजाहिरात प्रसिध्द करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी’, असे या परिपत्रकात म्हटलेले आहे.