Wed, Nov 13, 2019 13:04होमपेज › Pune › भोंदूबाबाचा सासू-सुनेवर बलात्कार

पुणे: भोंदूबाबाचा सासू-सुनेवर बलात्कार

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:42AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे सांगत एका भोंदूबाबाने आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने  महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर वेळोवेळी त्यांच्याकडून आठ लाख रुपये, तवेरा, टाटा सुमो, स्कोडा कार, बुलेट दुचाकी, सँट्रो कार, सातारा येथे एक फ्लॅट आणि पुण्यात एक कार्यालय अशी लाखोंची संपत्ती उकळल्याचेही उघड झाले आहे.  याप्रकरणी भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. 

हैदरअली रशीद शेख (47, गुरुवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध  अधिनियम 2017 च्या कलम 3 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2012 तसेच पॉक्सो अधिनियम 2012 नुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. न्यायालयाने भोेंदूला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती उच्चशिक्षित आहे. महिलेचा त्याच्याशी 1999 साली निकाह झाला. ते मुळचे सातार्‍याचे आहेत; परंतु पुण्यात पतीचा व्यवसाय आहे. त्यामुळे या ठिकाणी स्थायिक झाले. 2003 मध्ये महिलेला रक्ताच्या उलट्या  होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे असा त्रास होत होता. त्यावेळी पुण्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, तरीही परिणाम होत नव्हता. त्यानंतर तिच्या सासूला हैदरअली शेख याच्याकडे दैवीशक्ती असल्याचे समजले. त्याने या दैवीशक्तीच्या आधारे अनेकांचे आजार बरे केले असल्याची माहिती मिळाली. महिलेवर काहीतरी काळ्या जादूचा प्रभाव असावा, असा समज झाल्याने त्यांनी हैदरअली शेखकडे नेले.  काळ्या जादूचा प्रभाव उतरविण्यासाठी महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने हैदरअली घरी येऊ लागला. त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर याबाबत पतीला किंवा कोणाला सांगितले तर तुझ्यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही आणि मी सर्व चित्रीकरण केले आहे. त्यामुळे बदनामी करीन असे पीडित महिलेला धमकावले.  बदनामीच्या भीतीने महिलेने कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर महिलेने त्याला कुटुंबीयांना घरात उपचार करणे आवडत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने उपचारासाठी बाहेर जावे लागेल असे तिच्या पतीला सांगितले. तसेच त्याच्या व्यवसायात बरकत येण्यासाठी तिला घेऊन बाहेर जावे लागेल असे सांगून वेळोवेळी महाबळेश्‍वर, रत्नागिरी, सातारा येेथे नेऊन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही केले. त्यासोबतच 2006 साली महिलेच्या सासूवरही उपचाराच्या बहाण्याने भोंदूने लैंगिक अत्याचार केले. याबाबत महिलेने पतीला सांगितले. मात्र, त्याने तिच्यावर विश्‍वास ठेवला नाही. या प्रकारानंतर काही दिवसांनी पतीकडून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी म्हणून रोख रक्कम, एक टाटा सुमो, तवेरा, स्कोडा कार, सॅन्ट्रो कार, एक फ्लॅट आणि एक ऑफिस घेतले. त्यानंतरही भोंदूबाबाचे घाणेरडे कृत्य सुरूच होते. एकेदिवशी महिला व तिची सासू घरी असताना तिच्या चौदा वर्षीय मुलीशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने मुलीला त्याच्यासमोर यायचे नाही, असे सांगितले. त्यामुळे हा प्रकार समोर आला. महिलेने त्याच्याविरोधात थेट खडक पोलिसात धाव घेतली. सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास खडकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी करत आहेत.