Sun, Sep 23, 2018 11:50होमपेज › Pune › राज्यात मंगळवारपासून पुन्हा पाऊस

राज्यात मंगळवारपासून पुन्हा पाऊस

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:40AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यात मंगळवारपासून हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांत उद्या सोमवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, पुढील 2-3 दिवस पाऊस पडेल, असेही नमूद केले आहे. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे सध्या केरळ, तमिळनाडू येथे वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडत असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिउष्ण व आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. 
2009 मध्ये ‘फियान’ चक्रीवादळ 11 नोव्हेंबर रोजी अलिबाग व मुंबईदरम्यान महाराष्ट्रात धडकले होते. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता केवळ 20 टक्केच आहे. ‘ओखी’ची तीव्रता समुद्रातच कमी होणार असल्यामुळे महाराष्ट्रात ते चक्रीवादळाच्या स्वरूपात प्रवेश करणार नाही

. दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यासह राज्याच्या काही भागांत 2-3 दिवस अचानक पाऊस पडल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. आता शेतकरी चिंतातूर झाले असून, ऐन थंडीत पुन्हा राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण होईल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे 10 अंश सेल्सिअस झाली. पुणे 12.4, नगर 13.2, सातारा 16.4, कोल्हापूर 19.5, मुंबई 20, सोलापूर 15.5, औरंगाबाद 13.6, नाशिक 11.6, नागपूर 11.3 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली.