Tue, Jul 23, 2019 02:46होमपेज › Pune › वारंवारच्या ब्लॉकमुळे लोकल प्रवासी हैराण

वारंवारच्या ब्लॉकमुळे लोकल प्रवासी हैराण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान प्रवास करणारे प्रवासी रेल्वेकडून वारंवार घेण्यात येणार्‍या ब्लॉकमुळे पुरते हैराण झाले आहेत. पुणे विभागाकडून रेल्वे ट्रॅकच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी ब्लॉक ठेवण्यात येतो. यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, रविवारी सुटीला त्यांना इच्छित स्थळी जाताच येत नसल्याने खोळंबा होतो. 

नोव्हेंबर महिन्यात रेल्वेकडून आतापर्यंत दोन रविवारी ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात ब्लॉक ठेवण्यात आला असून, चार लोकल महिनाभर रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे डिसेंबर महिन्यात पुणे व लोणावळादरम्यान प्रवास करणार्‍यांचे हाल होणार आहेत. दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान लोणावळा लोकल नसल्याने त्या वेळेतच ब्लॉक घेण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

सध्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यानच्या लोकल रद्द करण्यात येत असल्याने रविवारी प्रवासी लोकलने प्रवासच करू शकत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी चिंचवड येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक लोकलला तासभर उशीर झाला होता.  

या पार्श्‍वभूमीवर वारंवार घेण्यात येणार्‍या ब्लॉकमुळे व लोकलला सातत्याने होणार्‍या विलंबामुळे लोणावळा लोकलने आम्ही प्रवास करायचाच नाही का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.