Sun, Jul 21, 2019 12:55होमपेज › Pune › पुणे रेल्वे स्टेशनवर लवकरच बॅटरीवर चालणारी वाहने  

पुणे रेल्वे स्टेशनवर लवकरच बॅटरीवर चालणारी वाहने  

Published On: Jan 23 2018 3:10PM | Last Updated: Jan 23 2018 3:10PMपुणे: प्रतिनिधी 

पुणे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसात बॅटरीवर चालणारी दोन छोटेखानी वाहने सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही दोन वाहने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 2014 मध्ये बॅटरीवर चालणारी वाहने रेल्वेच्या पुणे विभागाला दान करण्यात आली होती. वर्षभर ती वाहने सुरू होती. मात्र, कालांतराने ही सेवा बंद करण्यात आली. 

पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक सर्वात मोठा असून तो 610 मीटर लांबीचा आहे. 26 डब्यांच्या गाड्या मावू शकतील, असा हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींना एका टोकाहून दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी अर्धा ते पाऊण किलोमीटरची पायपीट करावी लागते. यात त्यांची पुरती दमछाक होते.  गाडी सुटण्याच्या वेळेस त्यांची दमछाक होऊ नये व त्यांना या बॅटरीवर चालणार्‍या गाडीतून इच्छित डब्यापर्यंत सहज पोहोचता यावे, हा या मागचा उद्देश असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकार्‍याने पुढारीशी बोलताना दिली. 

पुणे स्टेशनवर अपंग, ज्येष्ठांच्या सोयीकरिता व्हील चेअरच नसल्याने या बॅटरीवर चालणार्‍या गाड्यांचा निश्‍चितच उपयोग होणार आहे. एका खासगी संस्थेकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही सेवा सशुल्क असेल की निःशुल्क याबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही. देशात तिरुचिरापल्ली, चेन्नई, म्हैसूर, विशाखापट्टणम येथे ही सेवा या आधीच सुरू आहे.