Wed, Nov 21, 2018 21:41होमपेज › Pune › पुणेकरांची थंडीच्या कडाक्यापासून सुटका

पुणेकरांची थंडीच्या कडाक्यापासून सुटका

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:57PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर व परिसरात गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा किंचित वधारल्यामुळे नागरिकांची थंडीच्या कडाक्यापासून सुटका झाली आहे. गारठा कमी झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असून येत्या संपूर्ण आठवडाभर तापमानाचा पारा 11 ते 12 अंशाच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात 7 ते 8 अंशापर्ंयत तापमानाचा पारा घसरल्यामुळे नागरिकांना बोचर्‍या थंडीचा सामना करावा लागत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हाच पारा 11 ते 12 अंशाच्या दरम्यान स्थिर राहताना दिसून येत आहे. गुरूवारी 12.1 अंश असलेला तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 0.6 अंशांनी घसरून शुक्रवारी 11.5 अंश नोंदवला गेला. त्यामुळे गेली दोन दिवस रात्री आणि पहाटेचा थंडीचा कडाका पूर्णपणे ओसरल्याचे दिसून येत आहे.

पुढील आठवडाभर शहर व परिसरात आकाश निरभ्र राहणार असून 11 ते 12 अंशांच्या घरात किमान तापमान नोंदविले जाईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान शुक्रवारी कमाल 29 तर किमान 11.5 अंश तापमान नोेंदविले गेले आहे.