Sun, Jul 21, 2019 05:58होमपेज › Pune › लाखाच्या आतील ठेवी जानेवारीअखेर परत करणार

लाखाच्या आतील ठेवी जानेवारीअखेर परत करणार

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:12AM

बुकमार्क करा
पुणे  : प्रतिनिधी

अवसायनात काढलेल्या लोकसेवा सहकारी बँकेत 88 पतसंस्थांच्या 120 कोटींच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्यापैकी एक लाखापर्यंतच्या आतील ठेवीदारांच्या शंभर टक्के ठेवी प्राधान्याने परत देण्यात येतील, अशी माहिती लोकसेवा बँकेचे अवसायक व जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) बी. टी. लावंड यांनी दिली. ही रक्कम सुमारे 17 कोटींच्या  आसपास असून, ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) प्रस्तावास अंतिम मान्यता घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  बँकेच्या अवसायकचा पदभार घेतल्यानंतर मागील तीन महिन्यांत सुमारे चार कोटींची वसुली व व्याजाचे एक कोटी मिळून बँकेस पाच कोटी रुपये मिळाल्याबद्दल  लावंड यांचा सत्कार राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, देविदास भन्साळी व अन्य पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले की, अवसायकाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकसेवा बँकेची एकूण गुंतवणूक 133 कोटी रुपयांची झालेली आहे. सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे यांनी बँकेचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते नुकतेच पूर्ण झालेले असून, ठेव विमा महामंडळाने केलेल्या सूचनेनुसार रुपये एक लाखाच्या आतील रक्कम असणारी ठेवीदारांची यादी अंतिम करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकूण 7 हजार 500 ठेवीदारांच्या 16 कोटी 82 लाख रुपयांच्या ठेवी देणे आहे. ही रक्कम संबंधित ठेवीदारांना देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात तो अंतिम मान्यतेसाठी ठेव विमा महामंडळाकडे पाठविण्यात येत आहे. त्यांची मान्यता घेऊन संबंधितांना जानेवारीअखेर ही रक्‍कम देण्याचा माझा प्रयत्न आहे.