Mon, Jun 24, 2019 17:53होमपेज › Pune › राजकीय, कॉर्पोरेट प्रतिस्पर्ध्यांवर हेरांंमार्फत ‘वॉच’

राजकीय, कॉर्पोरेट प्रतिस्पर्ध्यांवर हेरांंमार्फत ‘वॉच’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :पुष्कराज दांडेकर 

 निवडणुकीच्या काळात प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रणनीतीची माहिती काढण्यासाठी राजकीय पुढार्‍यांकडून, तर कॉर्पोरेट जगतात आयटी कंपन्या व इतर कंपन्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून सुरक्षेसाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचा ट्रेंड सध्या पुण्यात रुजल्याचे पाहायला मिळतआहे. 

 आपण बॉलिवूड आणि हॉलिवूड पटांतूनच खाजगी गुप्तहेरांमार्फत राजकीय आणि कॉर्पोरेट जगतातील हालचालींवर लक्ष ठेवल्याचे पाहिले आहे. परंतु प्रत्यक्षात  या जगतात  तीव्र स्पर्धा असल्याने प्रतिस्पर्ध्यांकडून स्वत:च्या व्यवसाय वृद्धीसाठी, इमेज तयार करण्यासाठी नवीन क्लृप्त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला नामोहरम करण्यासाठी आपला प्रतिस्पर्धी काही करतोय का, या संशयातून राजकीय पुढारी व कॉर्पोरेट कंपन्या खासगी गुप्तहेरांची नेमणूक करताना दिसत आहेत. 
 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चुरशीची लढत होत असते. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस असते. पूर्वी प्रतिस्पर्ध्याचा माणूस फोडून ही माहिती मिळविली जात होती. मात्र काळ बदलला आणि पद्धतही बदलत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणती रणनीती अवलंबिली आहे, आपल्याविरोधात काही कट तर शिजत नाही ना, याची उत्सुकता असल्याने खासगी गुप्तहेरांमार्फत ही माहिती काढण्याचा ट्रेंड नव्याने निवडणुकांमध्ये रुजलेला आहे. मागील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासगी गुप्तहेरांची मदत घेतली गेल्याची अनेक उदाहरणे  एका खासगी गुप्तहेराने सांगितली. तीव्र स्पर्धेतून होतो वापर कॉर्पोरेट जगतात कंपन्यांमध्ये व्यवसाय वृद्धीच्या तीव्र स्पर्धेतून एकमेकांच्या यंत्रणेवर सायबर हल्ले ही कंपन्यांची डोकेदुखी बनली आहे.

त्यामुळे आयटी कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांची यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. या कंपन्यांना खासगी गुप्तहेर, सुरक्षा एजन्सी यांच्या मदतीची गरज पडते.  अशा प्रकारची मदत घेण्याचा ट्रेंड केवळ मुंबई आणि काही महत्त्वाच्या शहरांत होता. मात्र  पुण्यातील आयटी कंपन्यांचे पसरलेले जाळे, विदेशी कंपन्यांची वाढलेली रेलचेल यामुळे ही स्पर्धा वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत या कंपन्या उतरलेल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांकडून केल्या जाणार्‍या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे किंवा त्यासाठी उपाय म्हणून खासगी गुप्तहेर किंवा सुरक्षा एजन्सीच्या मदतीने आपली यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी खास सायबर सेल स्थापन करून त्यांची मदत घेतली जाते.