Mon, Sep 24, 2018 19:38



होमपेज › Pune › एसटीतील खासगी सावकारांचा उठणार बाजार

एसटीतील खासगी सावकारांचा उठणार बाजार

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:26AM



पुणे : प्रतिनिधी 

एसटीतील कर्मचार्‍यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खासगी सावकारी करणार्‍या एसटीतील काही तथाकथित अधिकारी किंवा कर्मचार्‍यांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा  एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते. त्यानुसार एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागातर्फेतातडीने परिपत्रक काढून अशा प्रकारे अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देणार्‍या कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे यापुढे एसटीतील खासगी सावकारांचा यापुढे बाजार उठणार असल्याचे चित्र दिसत आहे.

एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या  आर्थिक गरजा भागविण्यासाठी मध्यवर्ती स्वरूपाची एसटी कर्मचारी सहकारी बँक अस्तित्वात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन सरकारी पतसंस्थांची स्थापना केली आहे. याबरोबरच एसटीच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या वेतनावर आधारित सरकारी व सहकारी बँकातून पतपुरवठा केला जाऊ शकतो. असे असताना कर्मचार्‍यांच्या अज्ञानाचा व आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यातील काही कर्मचारी व अधिकारी अवैधरित्या खासगी सावकारीच्या माध्यमातून तब्बल 10 ते 30 टक्के प्रति महिना या दराने पैसे व्याजाने देत असल्याबाबत व त्याच्या वसुलीसाठी बेकायदेशीररीत्या या कर्मचार्‍यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी रावते यांच्याकडे कर्मचार्‍यांनी केल्या होत्या.  

ग्रामीण व शहरी भागातील एसटीच्या आगारात कर्मचार्‍यांच्या ‘भिशी’ च्या नावाखाली असा छुपा खासगी सावकारांचा धंदा फोफावला होता. एसटीतील अनेक कर्मचारी अशा खासगी सावकारीच्या पाशात अडकले होते. काही ठिकाणी या तथाकथित सावकारीच्या अत्याचाराविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी पण दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या चौकशीअंती अशाप्रकारे सावकारी करणारे लोक एसटीचे कर्मचारी असल्याचे पुढे आले. काही एसटीचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या नडलेल्या कर्मचार्‍यांना व्याजाने पैसे घेण्यास प्रवृत्त करत, नंतर व्याजासाठी त्यांच्यावर अवैधरित्या दबाव आणत होते. 

अशा अनधिकृत सावकारांच्या धाक दपटशाहीमुळे संबंधित कर्मचारी त्यांना टाळण्यासाठी व तोंड लपविण्यासाठी आपल्या दैनंदिन कामावर गैरहजर राहू लागले. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या कामकाजावर होऊ लागला. असे गैरप्रकार थांबविण्याच्या हेतूने एसटी महामंडळाच्या आवारात बेकायदेशीर व अनधिकृतरित्या व्याजाने पैसे देणे किंवा घेण्याबाबतचे व्यवहार करणार्‍या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र सावकारी अधिनियम अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.