Thu, Apr 25, 2019 14:03होमपेज › Pune › पंतप्रधान प्रोत्साहन च्या कर्मचार्‍यांना सवलती आयुक्तांची माहिती 

पंतप्रधान प्रोत्साहन च्या कर्मचार्‍यांना सवलती आयुक्तांची माहिती 

Published On: Feb 07 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 11:56PMपुणे : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या  पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुणे विभागात आतापर्यंत नव्याने नोकरीवर रुजू झालेल्या 72 हजार कर्मचार्‍यांना सवलती देण्यात आल्या आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने  सुमारे  7 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या योजनेचा देशातील सुमारे  वीस लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना  लाभ झालेला  आहे. केंद्र सरकारने नव्याने नोकरीवर रुजू होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी कमर्र्चारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीएफ) 12 टक्क्यांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. रोजगाराला प्रोत्साहनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  याबाबत  केंद्र सरकार लवकरच  मार्गदर्शक नियमावली तयार करणार आहे, अशी माहिती  पुण्यातील कर्मचारी  भविष्य निर्वाह  निधी कार्यालयाचे आयुक्त अरुण कुमार यांनी दिली.

 पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत नव्या कर्मचार्‍यांना ही सवलत देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना अरुण कुमार म्हणाले, “सध्या नोकरी करीत असलेल्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनामधून  12 टक्के  पी.एफ. कापण्यात येत आहे. तेवढाचा भाग कंपनी भरत असते. ही  रक्कम कर्मचार्‍याच्या पी.एफ. खात्यात जमा केली जाते.  या योजनेनुसार  मार्च 2016 पासून कामावर नव्याने रुजू होणार्‍या  कर्मचार्‍यांसाठी कंपनीच्या वतीने  दिल्या जाणार्‍या  योगदानापैकी केवळ 3.67 टक्के रक्कम भरावी लागत होती. ही रक्कम कर्मचार्‍यांच्या पी.एफ. खात्यात जमा केली जात होती, तर उर्वरित 8.33 टक्के रक्कम शासनाकडून थेट  कर्मचार्‍यांच्या नावे पेन्शन फंडामध्ये जमा  केली जात होती.

ही रक्कम आता थेट 12 टक्क्यांवर नेण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी अधिक  रोजगारनिर्मिती करावी यासाठी ही घोषणा करण्यात आली असून  केवळ नव्या कर्मचार्‍यांसाठी तीन वर्षांपर्यंत ही सवलत राहणार आहे. दरम्यान,  अर्थसंकल्पातील नव्या घोषणेनुसार कंपनीच्या वाट्याचे 12 टक्के योगदान केंद्र शासन  भरण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची मार्गदर्शक नियमावली अद्याप आलेली  नाही, असे  केंद्रीय भविष्य निर्वाह निधी  कार्यालयाच्या पुणे विभागाचे आयुक्त अरुण कुमार  यांनी सांगितले. 

महिला कर्मचार्‍यांचे वेतन वाढणार?

नव्या आर्थिक वर्षात नोकरीवर रुजू होणार्‍या  महिला कर्मचार्‍यांना तीन वर्षांपर्यंत भविष्य निर्वाह निधीमध्ये 12 टक्क्यांऐवजी केवळ 8 टक्केच रक्कम जमा करावी लागणार आहे. परिणामी  महिलांच्या हाती येणारे वेतन वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे  अर्थमंत्री जेटली यांनी जाहीर केले होते. मात्र, उर्वरित रक्कम कोण भरणार हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. या दोन्ही सवलती एक एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असेही  आयुक्त अरुण कुमार यांनी सांगितले.