Sun, Jul 12, 2020 15:19होमपेज › Pune › पंतप्रधान आवास मार्चमध्ये

पंतप्रधान आवास मार्चमध्ये

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 1:49AM

बुकमार्क करा
पुणे : नेहा सराफ 

नव्या वर्षाचे आगमन पुणेकरांसाठी खुशखबर घेऊन आले असून आगामी मार्च 2018मध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या परवडणारी घरे अंतर्गत 6 हजार 200 घरासाठी लॉटरी निघणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ष अनेकांना स्वतःचे घर देणारे ठरेल यात शंका नाही.    देशभरात कोठेही मालकी हक्काचे घर नसलेल्या नागरिकांना 2022 पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकातील जनतेला अल्प व्याजदराच्या कर्जावर परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील गृहक्षेत्राच्या विकासाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

शहरी भागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए), गृहकर्जाच्या व्याजावर सवलत, परवडणार्‍या किंमतीत घरे आणि स्वतःच्या मालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे अशा चार घटकांसाठी ही योजना राबिवण्यात येणार आहे. तब्बल 1 लाख 13 हजार 228 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत 28 हजार 90, गृहकर्जावरील व्याजाच्या सवलतीसाठी 28 हजार 148, परवडणार्‍या घरांसाठी 41 हजार 783 आणि स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मागणार्‍यांचे 15 हजार 207 अर्ज आले आहेत.  

    परवडणार्‍या घरांसाठी आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर 17 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. सुरुवातीला सुमारे 6 हजार 200 परवडणारी घरे बांधण्यात येणार आहे. एक घर सुमारे 320 चौरस मीटरचे असणार आहे. यासाठीचा विकास आराखडा मुंबईला म्हाडाच्या कार्यालयात पाठविण्यात आला आहे. तो येत्या काही दिवसात मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच लॉटरीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.