Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Pune › प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनीच लाटले कोट्यवधी

प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनीच लाटले कोट्यवधी

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 12:13AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नावाची संघटना आहे. या संघटनेचे राज्यात जवळपास पावणेतीन लाख सदस्य असल्याचा संघटनेचा दावा आहे. याच संघटनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी संघटनेतील शिक्षकांना पावती पुस्तकाच्या माध्यमातून देणगी घेण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रूपयांना गंडा घातला आहे. त्यातील एका रूपयाचा देखील हिशोब दिला नसल्याची माहिती संघटनेचे नूतन राज्य उपाध्यक्ष गिरीश नाईकडे यांनी दिली असून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे दर तीन वर्षांनी एकदा दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होते. यामध्ये संघटनेच्या नियमाप्रमाणे संघटनेतील पदाधिकार्‍यांना राजीनामा द्यावा लागतो. आणि नविन कार्यकारणीची निवड केली जाते. अशीच नविन कार्यकारीणी नियुक्त करण्यात आली आहे. या कार्यकारीणीतील नविन पदाधिकारींची माहिती आणि माजी पदाधिकार्‍यांनी केलेल्या अपहाराचा भांडाफोड करण्यासाठी समितीतर्फे सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे राज्य कार्याध्यक्ष शंकरराव मनवाडकर, कोषाध्यक्ष राजाभाऊ राऊत, उपाध्यक्ष गिरीश नाईकडे आणि समितीचे संस्थापक भानूदास शिंपी यांचे चिरंजीव उमेश शिंपी आदी उपस्थित होते.

समितीचे उपाध्यक्ष नाईकडे म्हणाले, समितीच्या 56 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समितीच्या पदाधिकार्‍यांनीच समितीच्या पैशांचा अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. समितीचे माजी राज्याध्यक्ष काळू बोरसे, माजी सरचिटणिस उदय शिंदे, माजी कार्याध्यक्ष विजय कोंबे या तीन पदाधिकार्‍यांनी अन्य दोन माजी पदाधिकार्‍यांना हाताशी धरून समितीतील शिक्षकांना अधिवेशनासाठी पैसा गोळा करायचा आहे. असे सांगत प्रती शिक्षक तसेच हितचिंतक पाचशे रूपये अशा तब्बल साडेतीन ते चार लाख पावत्या दिल्या आहेत. तसेच समितीचीच तब्बल 1 कोटी 14 लाख रूपये शिल्लक रक्कम असताना आणि त्यातील केवळ साठ ते सत्तर लाख रूपये अधिवेशनासाठी खर्च अपेक्षित असताना या पदाधिकार्‍यांनी मात्र पावत्यांच्या माध्यमातून सात ते आठ कोटी रूपये गोळा केले आहेत. त्यातील एका रूपयाचा देखील हिशोब समितीला दिला नाही.

समितीचे कोल्हापूर येथील कार्याध्यक्ष शंकरराव मनवाडकर म्हणाले, धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेतल्याशिवाय समितीच्या पदाधिकार्‍यांना शिक्षकांकडून पावतीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही. परंतु या पदाधिकार्‍यांनी धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता पैसा गोळा केला आहे. 15 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडला कारण 3 जानेवारीला सिंधुदूर्ग जिल्ह्यात समितीचे दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. याच काळात हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तीन वर्षांची मुदत असताना या पदाधिकार्‍यांनी एक वर्ष वाढवून घेतले आणि याच वर्षात पैशांचा मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. त्यांच्यावर धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करून फौजदारी गुन्हा देखील दाखल करणार आहे.