Thu, Feb 21, 2019 13:08होमपेज › Pune › गर्भवतींना मिळणार पाच हजार

गर्भवतींना मिळणार पाच हजार

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:09AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मृत्युदरांत घट व्हावी यासाठी आरोग्य विभागाने ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ ही योजना 8 डिसेंबरपासून राज्यात लागू केली आहे. यामध्ये गरोदरपणापासून प्रसूतीपश्‍चात बाळास विविध लस देण्यापर्यंतच्या कालावधीत लाभार्थीला एकूण तीन टप्प्यात पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूतीनंतरही लगेच गरीब महिलांना मजुरीसाठी व इतर काम करावे लागते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने या गर्भवती महिला व बालके कुपोषित राहून मातामृत्यू आणि बालमृत्यू दर वाढतोे. म्हणून गर्भवतींना बुडीत मजुरी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

तसा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे. या योजनेचा लाभ केवळ एकदाच मिळणार असून, जीवित अपत्यापुरताच मर्यादित आहे. यामध्ये नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ मिळेल. पात्र लाभार्थी महिलेला पाच हजार रक्कम तिच्या संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील  खात्यात तीन टप्प्यात जमा केली जाईल. तसेच लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत 700 (ग्रामीण भाग) व 600 रुपये (शहरी भाग) मिळतील.