Fri, May 24, 2019 02:25होमपेज › Pune › बटाट्याची आवक वाढली

बटाट्याची आवक वाढली

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 1:47AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात तळेगावच्या नवीन बटाट्याची आवक सुरू झाली असून बाजारात दररोज 4 ते 5 गाड्या बटाटा बाजारात दाखल होत आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, मंचर तसेच जुन्नर भागातून ही आवक होत असून त्याच्या प्रतिकिलोस 10 ते 14 रुपये दर मिळत असल्याची माहिती बटाट्याचे व्यापारी राजेंद्र कोरपे  यांनी दिली. बाजारात राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक होत असते. यात पुखराज, ज्योती या दररोजच्या खाण्यातील बटाट्यासह अ‍ॅटलांटा, 1533, वटी, एलआर, एफ सी 3, एफ सी 5 या वेफर्ससाठी आवश्यक बटाट्यांचा समावेश आहे.

दररोज इंदोरहून 15 ते 20 गाड्या, आग्रा येथून 50 गाड्या तर स्थानिक परिसरातून 4 ते 5 गाड्या बटाटा बाजारात दाखल होत आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, मंचर व जुन्नर भागातून बटाटा विक्रीसाठी येत आहे. सध्या घाऊक बाजारात आग्रा बटाट्याला प्रति दहा किलोस 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. तळेगावहून पुखराज, ज्योती या बटाट्याच्या वाणाची आवक सुरू झाली असून त्याच्या प्रतिदहा किलोस 100 ते 140 रुपये दर मिळत आहे. तर, वेफर्ससाठी आवश्यक बटाट्याला घाऊक बाजारात प्रतिदहा किलोस 180 ते 220 रुपये भाव मिळत असल्याचेही कोरपे यांनी सांगितले. 
परराज्यात पंजाबमध्ये वटी, मध्य प्रदेशात अ‍ॅटलांटा, उत्तर प्रदेशात एलआर तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात ज्योती आणि पुखराज या वाणाचे उत्पादन घेतले जाते.

स्थानिक व आग्रा परिसरातून येणारा बटाटा हा प्रामुख्याने घरगुती ग्राहकांकडून खरेदी करण्यात येतो. हा बटाटा तळल्यानंतर लालसर रंग येत असल्याने वेफर्स उत्पादक त्याची खरेदी करण्यास इच्छुक नसतात. तर आग्रा येथील बटाटा दिसायला आकर्षक आणि टिकाऊ असल्याने किरकोळ व घरगुती ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी असते असेही कोरपे यांनी नमूद केले.