होमपेज › Pune › पोस्ट बॉक्स क्रमांक घेण्याचे प्रमाण वाढले

पोस्ट बॉक्स क्रमांक घेण्याचे प्रमाण वाढले

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी 

टपाल कार्यालयाच्या  जीपीओमध्ये ‘पोस्ट बॉक्स’ क्रमांक घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असून, मागील काही महिन्यात सुमारे दोनशे जणांनी या क्रमांकांचा लाभ घेतला आहे. कार्यालयाकडे हे क्रमांक घेण्यासाठी अर्ज येत आहेत. त्या अर्जाची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. सध्या इंटरनेट आणि ई-मेल या तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात मेल आणि निरोप लागलीच संबंधित व्यक्ती अथवा एखाद्या संस्थेच्या अधिकार्‍याला काही मिनिटांतच पोहोचत असतो; मात्र या जमान्यातही टपाल कार्यालयाने खूप वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘पोस्ट बॉक्स आणि बॅग’ या क्रमांकांना खासगी कंपन्या, विविध प्रकारच्या संस्था तसेच राज्याबाहेरून शहरात ठराविक कालावधीसाठी शिक्षण अथवा नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या नागरिकांनाही अत्यंत उपयोगी पडत असल्याचे दिसून आले.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक कंपन्या; तसेच शैक्षणिक संस्था त्याचबरोबर काही खासगी संस्थांची कार्यालये आहेत. या कंपन्यांना बाहेरगावाहून तसेच परदेशातून महत्त्वाची पत्रे येत असतात. ही पत्रे पोस्टमनकडून वेळेवर पोहोचतीलच असे नाही किंवा कंपन्यांची कार्यालये टपाल कार्यालयापासून दूर असल्याने त्यांना पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे या कंपन्या किंवा संस्था त्यांच्या सोयीसाठी टपाल कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या ‘पोस्ट बॉक्स तसेच बॅग क्रमांक’ या सुविधा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार या कंपन्या अथवा इतर संस्था पोस्ट बॉक्स आणि बॅग क्रमांकासाठी नियमानुसार अर्ज करू शकतात. त्यासाठी वर्षाला दोनशे ते तीनशे रुपये या बॉक्सचा चार्ज भरावा लागतो.  नियमानुसार संबंधितांनी बॉक्स क्रमांक घेतल्यावर त्या बॉक्सची चावी संबंधिताकडे, तर दुसरी चावी वरिष्ठ पोस्टमास्तर यांच्याकडे ठेवण्यात आलेली असते. त्यानुसार कर्मचार्‍यास घेऊनच हा बॉक्स  उघडावा लागतो.