Wed, Apr 24, 2019 15:56होमपेज › Pune › वडगाव शेरीतील मुळीक बंधू ठरले 'डार्क हॉर्स'

वडगाव शेरीतील मुळीक बंधू ठरले 'डार्क हॉर्स'

Published On: Mar 03 2018 5:27PM | Last Updated: Mar 03 2018 5:27PMपुणे : पांडुरंग सांडभोर

राजकारणात नशीब कधी कोणाला साथ देईल हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय सध्या वडगाव शेरीतील मुळीक बंधूंना पाहून येत आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी ज्या मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून येणे जिकरीचे होते, त्याच ठिकाणी दोन वेळेस नगरसेवकपद, आमदारकी आणि आता स्थायी समितीचे अध्यक्षपदी मुळीक बंधुकडे येत आहे. त्यामुळे  मुळीक बंधु खऱ्या अर्थाने राजकारणातील 'डार्क हॉर्स'  ठरले आहेत.

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश यांना सत्ताधारी भाजपने उमेदवारी दिली आहे. मुळीक हे स्थायी समितीचे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट आहे.  2012 पालिकेच्या निवडणुकीत योगेश मुळीक यांच्या रूपाने भाजपला पहिला नगरसेवक वडगाव शेरीत मिळाला. खरंतर मुळीक कुटुंब हे पहिल्यापासून भाजप समर्थक. विद्यमान आमदार जगदीश मुळीक हे शहर भाजपमध्ये पदाधिकारी काम करीत असताना त्यांनी 2012 च्या पालिका निवडणुकित स्वतः न उतरता बंधू योगेश याला भाजपची उमेदवारी दिली. त्यावेळेस योगेश हे विजेत्यांच्या स्पर्धेत नव्हते, मात्र, शिवसेना आणि काँग्रेसच्या लढाईत योगेश विजयी झाले. 

पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना आणि भाजप यांची युती तुटली आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडील एकमेव पर्याय म्हणून जगदीश मुळीक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. ही निवडणूक लढविण्यासाठी जगदीश इच्छुकही नव्हते, मात्र, पक्षाला दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी ही निवडणूक लढवावी लागली, त्यावेळेस वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार बापू पठारे आणि सेनेचे सुनील टिंगरे अशीच लढत होती, मात्र, मोदी लाटेत जगदीश यांनी आमदारकीची लॉटरी लागली, जगदिश यांचा विजय हा त्यांच्या स्वतःसाठी आणि राजकीय विश्लेषकानाही अनपेक्षित असाच होता,  

आता पुन्हा एकदा त्यांचे बंधू योगेश यांना नशिबाने साथ दिली आहे. स्थायी समितीमधून भाजपचे चार सदस्य बाहेर पडले, त्यांच्या जागी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांच्या स्पर्धेत योगेश यांचं फारसं नव्हतंही, मात्र, आयत्यावेळी त्यांचं नाव पुढे आले, त्यानंतर अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असतानाही योगेश यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाची केवळ आता अनोपचारिकता उरली आहे. त्यामुळे मुळीक कुटुंबियाकडे आमदारकी पाठोपाठ आता पालिकेतील महत्वाचे मानले जाणारे स्थायी समितीच अध्यक्षपद चालून आले आहे.

डार्क हॉर्स म्हणजे काय?

शर्यतीत जो घोडा स्पर्धेत नसतो, मात्र, अखरेच्या क्षणी आघाडी घेऊन जो विजेता ठरतो, त्यास।डार्क हॉर्स हे विशेषण वापरले जाते.