Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Pune › ससूनमध्ये दोन गटांत हाणामारी

ससूनमध्ये दोन गटांत हाणामारी

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

ससूनमधील आपत्कालीन विभागात सोमवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास, हडपसर परिसरातील परस्परविरोधी असलेल्या दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांनी राडा घातला. या वेळी येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आपत्कालीन विभागातून बाहेर काढले. तसेच पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे. मांजरी येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी पहाटे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन गटातील काही जण जखमी झाले. याप्रकरणी   सोमवारी रात्री उशिरा दोन्ही गटांनी हडपसर पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दिली आहे.  

काही जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल केले. या ठिकाणीही  पहाटे सव्वा तीनच्या सुमारास दोन गटांतील कार्यकर्ते समोरासमोर आले. वाद वाढत जाऊन पुन्हा हाणामारी झाली. ससूनमधील सुरक्षा रक्षकांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.  गोंधळाची आणखी एक घटना  सोमवारी दुपारच्या वेळी याच विभागात गोंधळ घातल्याची दुसरी घटना घडली. ताडीवाला रोड परिसरात एका रुग्णाला विजेचा शॉक लागला. त्याला ससून रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या वेळी त्याच्या नातेवाइकांनी आपत्कालीन विभागात गोंधळ घातला.

तसेच एकाने तेथील खिडकीची काचही तोडली. या प्रकरणी ससून रुग्णालयाकडून बंडगार्डन पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार करण्यात येणार आहे. या दोन्ही वेळेस सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती योग्य रीतीने हाताळल्याने ससूनचे उपअधीक्षक डॉ. मनजित संत्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच असा गोंधळ घालणा-यांवर यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.