Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Pune › खुन्नस दिल्यावरून तरुणावर कोयत्याने वार

खुन्नस दिल्यावरून तरुणावर कोयत्याने वार

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कारमध्ये बोलत बसलेल्या तरुणांना खुन्नस दिल्यावरून दहा जणांच्या टोळक्याने मारहाण करत कोयत्याने वार केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला. तरुणांनी कारच्याही काचा फोडत दहशत माजवली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विनोद तानाजी फड (वय 23, रा. डोणजे, पानशेत) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमीचा आतेभाऊ अजय बबन वाघ (वय 18) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय याचा जखमी विनोद हा आतेभाऊ आहे. तो एका स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करतो. दरम्यान, तो व त्याचा आणखी एक मित्र गुरुवारी फिर्यादी अजय याला भेटण्यासाठी व्हॅन घेऊन सिंहगड परिसरात आले होते. ते वडगाव बुद्रुक परिसरात व्हॅनमध्ये अजयची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना आमच्याकडे काय पाहता, आम्हाला खुन्नस देता का म्हणून वाद घातला व शिवीगाळ केली. त्यावेळी जखमी विनोद फड याने भांडण सोडवले. त्यानंतर तिघेही तेथून निघून गेले. 

मात्र, परत काही वेळाने तीन दुचाकींवरून दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर वार केले. परंतु, तो वार चुकवून तेथून पळून गेला. त्यानंतर फिर्यादीचा आतेभाऊ विनोद याच्यावर कोयत्याने वार करून कारची तोडफोड केली. यात विनोद फड हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.