Mon, Nov 19, 2018 23:25होमपेज › Pune › वारकरी सेवेसाठी सात हजार कर्मचारी

वारकरी सेवेसाठी सात हजार कर्मचारी

Published On: Jul 05 2018 8:30PM | Last Updated: Jul 05 2018 8:37PMपुणे : प्रतिनिधी

संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनात कुठलीही उणीव भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. पोलिस, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरटीओ यांच्यासह विविध विभागातील  तब्बत सात हजारांवर अधिकारी व कर्मचारी वारकर्‍यांच्या सेवेला सज्ज आहेत. 

महसूल विभागाने 30 अधिकारी आणि 250 कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रत्येकी 500 कर्मचारी तर अनुक्रमे 13 आणि 6 अधिकारी वारकर्‍यांच्या सेवेत असणार आहेत.   वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी पुणे शहर पोलिसांचे 252 अधिकारी आणि 3 हजार 407 कर्मचारी तर पुणे ग्रामीणचे 121 अधिकारी आणि 1 हजार 674 पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. आरोग्य विभागाचे 134 अधिकारी तर 336 कर्मचारी तर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे 30 अधिकारी 80 कर्मचारी उपलब्ध राहतील.  असे एकूण 646 अधिकारी आणि 6 हजार 937 कर्मचारी पालखी सोहळ्यात सेवेसाठी सज्ज आहेत. श्री क्षेत्र देहू, आळंदी ते पुणे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोहळ्याच्या मार्गावरील सर्व मासांहरी हॉटेल्स, मच्छीमार्केट, कत्तलखाने व दारूची दुकाने पालखी कालावधीपासून बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे वारी समन्वय अधिकारी  उदय सिंह भोसले यांनी सांगितले.