Fri, Apr 26, 2019 00:02होमपेज › Pune › पुणे : पोलिसांनीच हडपले ११ लाख

पुणे : पोलिसांनीच हडपले ११ लाख

Published On: Jan 31 2018 2:18AM | Last Updated: Jan 31 2018 2:18AMपुणे : प्रतिनिधी

विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मालाची जबाबदारी असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनीच चार लाखांची रोकड, मोबाईल आणि दुचाकींची विक्री करून अफरातफर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी दोन निवृत्त सहायक फौजदार व  महिला कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करून यातील दोन अधिकार्‍यांना अटक केली आहे.   

निवृत्त सहायक फौजदार मनोहर गंगाराम नेतेकर (60, रा. आंबाई अपार्टमेंट, मारुती मंदिरासमोर, धायरी), जयवंत अमृत पाटील (59, रा. भारती कॉलनी, कर्वेनगर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. अलका गजानन इंगळे (52, रा. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या  महिला कर्मचार्‍याचे नाव आहे.  यासंदर्भात पोलिस निरीक्षक (गुन्हे) आप्पासाहेब वाघमळे (56) यांनी फिर्याद दिली आहे. 

नेतेकर हे 2016 मध्ये, तर जयवंत पाटील हे 31 ऑगस्ट 2017 रोजी निवृत्त झाले. अलका इंगळे यांची नुकतीच बदली झाली असून, त्या सध्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या नोंदी आणि ते सांभाळण्याची जबाबदारी  दोघांकडे होती. इंगळे या दोघांना मदतनीस म्हणून काम करत होत्या. हा प्रकार 2004 ते 2017 या कालावधीमध्ये घडला आहे. 

काय काय अफरातफर केली...

जप्त करण्यात आलेले चार लाख 8 हजार 506 रुपये, 90 हजारांचे 22 मोबाईल; तसेच 5 लाख 94 हजार रुपये किमतीची 23 दुचाकी वाहने, एक लॅपटॉप, 2 इलेक्ट्रॅानिक मीटर अशी तिघांनी अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी न्यायालयाचे आदेश नसताना लिलाव पद्धतीत दुचाकी वाहने विक्री केली. तसेच, बनावट दस्तऐवज तयार केले. नोंद रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून खाडाखोडही केली.