होमपेज › Pune › ...अन पुण्यात डिझेल सांडत धावली पीएमपीएमएल

...अन पुण्यात डिझेल सांडत धावली पीएमपीएमएल

Published On: Jan 24 2018 3:10PM | Last Updated: Jan 24 2018 3:23PMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील सार्वजनिक वाहतुकीची बिघडलेली घडी सुरळीत करण्यासाठी शासनाने  पीएमपीएमलच्या संचालकपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती केली. मोठया थाटात साहेबांनी कर्मचारी बदली, निलंबन कारवाईचा धडाका सुरु केला. मात्र, कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे चक्क रस्त्यावर डिझेल सांडत बस धावल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे तोट्यात चाललेली बस नफ्यात आणण्यासाठी मुंडे किमान बसच्या डिझेल टाकीला झाकण बसविणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील नागरिकांची वाहतूक करणारी पीएमपीएमलची बस ५ जानेवारीला एनडीए गेटच्या दिशेने चालली होती. या दरम्यान दुचाकी चालक सचिन बळे या तरुणास बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे लक्षात आले. तसेच टाकीमधून डिझेल गळती सुरू असल्याचे त्याला दिसल्याने त्याने ही घटना चालक आणि वाहकाच्या लक्षात आणून दिली. मात्र, दोन्ही कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत जाऊद्या रोजच आहे. असे उत्तर देत गाडीच्या खाली उतरण्याची तसदी घेतली नाही. 

दरम्यान, सिग्नल सुटल्याने चालकाने बस सुसाट दामटली. त्यानंतर संबंधित तरुणाने कोथरूड बसस्थानक नियंत्रकांना माहिती दिली.  दरम्यान तोट्यातील बस संस्था नफ्यात आणण्याचे उद्दिष्ट्य ठेवणाऱ्या शिलेदारांना बसच्या डिझेल टाकीचे झाकण बंद न करण्याच्या भूमीकेबद्द्ल  संचालक काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. चक्क पीएमटीच्या डिझेल टाकीला झाकणचं नसल्यामुळे मोठया प्रमाणात डिझेल गळती झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर बसला आग लागल्याची दुर्घटना घडली असती तर त्यास जबाबदर कोण? असा सवालही उपस्थित केला जात आहे.  बस १७४ क्रमांकाची एनडीए गेट (MH 12 DT 9029) डिझेल टाकीला  झाकण नसणारी बस किती अंतर अशीच धावली याची चौकशी करण्याची मागणी संबंधित तरुणाने केली आहे. 

‘‘सिग्नलवरुन गाडी सुटल्यावर गाडीच्या मागे बाईकवरुन पाठलाग केला. दुसऱ्या सिग्नलवर कंडक्टरला डिझेल गळत असल्‍याचेर सांगितले. तर त्यांनी "मरु दे रोजचच आहे हे... काय खरं नाही..." असे उत्तर दिले. पण प्रत्यक्षात हा प्रकार गंभीर होता. झाकणाच्या तोंडाजवळून डिझेल खाली पडताना लांबूनही दिसत होते. जर कोणीतरी सिगारेट किंवा काही अनुचित प्रकार केला असता तर, दुर्घटना घडली असता त्यास जबाबदार कोण?  प्रवाशांच्या जिवाची फिकीर नसलेले वाहक आणि चालकाने साधे खाली उतरुन प्रकार बघायची तसदी देखील घेतली नाही. 

    सचिन बळे