Fri, Jul 03, 2020 03:03होमपेज › Pune › बंदमुळे ‘पीएमपी’ची सेवा विस्कळीत

बंदमुळे ‘पीएमपी’ची सेवा विस्कळीत

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 1:57AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे पुणेकर नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपी बसची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी, सकाळी कामावर जाणारे कर्मचारी, तसेच परगावाहून शहरात आलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तीन दिवसांत सुमारे 50 बसचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये महामंडळाच्या 43 आणि खासगी सात बसचा समावेश आहे. तर, बुधवारी दिवसभरात सुमारे 27 बसचे नुकसान झाले आहे. साधारणपणे एक कोटी 50 लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

पीएमपीची बससेवा बंद झाल्याचा लाभ रिक्षाचालकांनी उठविला आणि मनमानी भाडे वसूल करण्याचा सपाटा लावला. कडकडीत बंदमुळे अतिशय धीम्या गतीने विविध मार्गांवर बससेवा सुरू होती. आंदोलनकर्त्यांनी आव्हाळवाडी, मांजरी, पुणे स्टेशन, खराडवाडी, गुलटेकडी, राजीव गांधी, अप्पर इंदिरानगर, कॅन्टोन्मेंट, देहूगाव, चिखली, येरवडा चौक, लोणीकंद फाटा, दांडेकर पूल, पानमळा, बापदेव घाट, उदयनगर (पिंपरी) नेहरूनगर चौक, लोकमान्य चौक, साधू वासवानी चौक, तळेगाव, वडगाव, या भागात बसेसवर दगडफेकीची प्रकार घडल्याचे  प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या आदेशानुसारच काही मार्गांवर बससेवा ठराविक अंतराने सुरू ठेवण्यात आली होती.

शहरात विस्कळीत झालेल्या बससेवेचा सर्वांत अधिक फटका परगावाहून शहरात आलेल्या नागरिकांना बसला. पीएमपीच्या बसस्थानकावर अनेक नागरिक बसची वाट पाहत उभे असल्याचे दिसून आले. याचा लाभ रिक्षाचालकांनी उठविला. त्यांनी अतिशय मनमानी पद्धतीने भाडे आकारण्यास सुरुवात केली. नागरिकही हे भाडे नाइलाजाने देत असल्याचे दिसून आले.