Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Pune › डेपोत उभी असलेली पीएमपी बस पेटली

डेपोत उभी असलेली पीएमपी बस पेटली

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 1:08AM

बुकमार्क करा

पुणे /पौडरोड : प्रतिनिधी        

कोथरूड बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. कर्मचार्‍यांनी अग्निशमन यंत्र, वाळू यांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.   अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलच्या कोथरुड येथील बस डेपोत बस क्रमांक एमएच 12 एचबी 1020 मार्गावर काढण्यापूर्वी बंद अवस्थेत असतानाच अचानक पेटली.  यावेळी डेपो व्यवस्थापक आणि चालकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती आणि अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, बसने चांगलाच पेट घेतला होता. याबाबत अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर दाखल झालेल्या कोथरूड अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी गजानन पाथ्रूडकर, अग्निशमन जवान पंढरीनाथ उभे, चालक शरद गोडसे यांच्या पथकाने तातडीने पाण्याचा मारा करून अवघ्या दोन मिनिटांत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, पूर्ण बस जळून खाक झाली. बसच्या इंजिनाच्या बाजूने आग लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. बंद बस कोणीतरी चालू करण्याचा प्रयत्न केला असावा, असा एक संशय आहे.  

सीएनजी बसमध्ये 22.5 किलोच्या 4 टाक्या असतात. त्यामुळे अशा बसमध्ये एकंदरीत 100 किलो गॅस भरलेला असतो. त्यामुळे महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रा. लि.च्या कर्मचारी प्रवीण देवकुळे लक्षात येताच धाव घेतली. कोथरूड डेपोतील कर्मचारी राजेंद्र खराडे, सचिन नाईक, आसिफ खान, राजेंद्र पायगुडे आणि इतर कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.