Wed, Apr 24, 2019 01:45होमपेज › Pune › पिफमध्ये सिप्पी, प्रसाद आणि राजदत्त यांचा सन्मान

पिफमध्ये सिप्पी, प्रसाद आणि राजदत्त यांचा सन्मान

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:33AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व ‘प्रसाद स्टुडिओज’चे प्रमुख रमेश प्रसाद आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल त्यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’(पिफ)मध्ये या पुरस्काराने गौरविल्या जाईल. तसेच, प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अ‍ॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. ‘पिफ’चे प्रकल्प संचालक श्रीनिवासा संथानम आणि निवड समिती सदस्य अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते. 

येत्या गुरूवारी, दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता कोथरूड सिटी प्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रमेश सिप्पी, रमेश प्रसाद आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याप्रमाणेच, राजदत्त यांना 18 जानेवारी रोजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभानंतर अ‍ॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे.