Fri, Jul 19, 2019 22:38होमपेज › Pune › बदल्यासंदर्भातील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

बदल्यासंदर्भातील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:20AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अपंग व्यक्ती अधिनियम 1995 व यासंदर्भात शासनाच्या आदेशामध्ये जे कर्मचारी अपंग आहेत किंवा मतिमंद मुलांचे पालक आहेत, अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग 1 चा दर्जा दिलेला असून या कर्मचार्‍यांना बदली प्रक्रियेतून सूट दिली आहे. परंतु याचा अनेक शिक्षकांनी गैरफायदा घेऊन अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे सादर करून बदली प्रक्रियेमधून सूट घेतली आहे. त्यामुळेच या बदल्यासंदर्भातील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची  फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसंदर्भात फेब्रुवारी 2017 मध्येच शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परंतु सुगम आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या वादात बदली प्रक्रिया रखडली. आता ही बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. त्यासाठी  नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. परंतु, अगोदर सुरू झालेल्या बदली प्रक्रियेतून सूट मिळवण्यासाठी शिक्षकांनी नामी शक्कल लढविली होती. त्यासाठी अंपगत्वाचा दाखला सादर केल्यास बदली प्रक्रियेतून सूट मिळते या निर्णयाचा आधार घेत अनेकांनी बेकायदेशीर अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र यासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच यावर पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी देखील उपस्थित करण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.