होमपेज › Pune › पार्किंग धोरणाविरोधात पालिका सभागृहात आणि बाहेरही आंदोलने(video)

पार्किंग धोरणाविरोधात पालिका सभागृहात आणि बाहेरही आंदोलने(video)

Published On: Mar 23 2018 5:35PM | Last Updated: Mar 23 2018 7:11PMपुणे : प्रतिनिधी

पोलिस आणि सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात "भाजप सरकार हाय हाय..पार्किंगच्या नावाखाली पुणेकरांचा खिसा कापणार्‍या पालिकेतील सत्ताधार्‍यांचा धिक्कार असो.., पार्किंगचा जिजीया कर रद्द करा..," अशी जोरदार घोषणाबाजी करत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पार्किंग धोरणाला तिव्र विरोध दर्शिवला. दरम्यान या आंदोलनामुळे पालिकेचे सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याने महापौरांना काही काळ दरवाजाबाहेरच थांबावे लागले. हीच अवस्‍था नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचीही झाली होती. 

स्थायी समितीने मंजूर केलेले पार्किंग धोरणास अंतिम मान्यता देण्यासाठी ते शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. याला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, पतितपावन, भीम छावा, हमारी अपणी पार्टी, युवक कॉंग्रेस, मनसे आदी राजकीय पक्ष आणि संघटनांनी  पालिका परिसरात तिव्र आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता. दोन्ही प्रवेशद्वारावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता.

पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांनाही आत जाण्यास मनाई केली. त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्याचा फटका नागरिकांसह नगरसेवक, कर्मचारी आणि  महापौरांनाही बसला. काहीकाळ महापौरांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. 

सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहात गोंधळ घातला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट टोप्या परिधान करून आले होते. मनसे व शिवसेनेने मुक्ता टिळक यांना निषेध म्हणून खेळण्यातील वाहने भेट दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी देण्यात आली.

Tags : pune, parking policy, against, protest,municipality,