होमपेज › Pune › आई-वडिलांचा झोपेत खून करणार्‍या पुत्राला कोठडी

आई-वडिलांचा झोपेत खून करणार्‍या पुत्राला कोठडी

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

आई-वडिलांचा धारदार हत्यारांनी झोपेतच खून करणार्‍या खुन्याला दि. 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शनिवार पेठेत राहणार्‍या कुटुंबातील उच्चशिक्षित मुलाने वृद्ध आई-वडिलांची झोपेत निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला होता. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली होती. तेव्हापासून तो रुग्णालयात दाखल होता. दरम्यान, त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  

पराग प्रकाश क्षीरसागर (30, रा. शनिवार पेठ) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (60, शनिवार पेठ) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (55) यांच्या खूनप्रकरणी प्रतीक क्षीरसागर (30) यांनी फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रकार दि. 7 डिसेंबर रोजी पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान घडला. परागने आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो हॉलमधील सोफ्यावर निवांत झोपला. परागची वहिनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उठली. ती बेडरूममधून बाहेर आली. त्या वेळी पराग सोफ्यावर झोपला होता. पण, त्याचे हात आणि छाती रक्ताने माखले होती. तर, किचनमध्येही रक्त होते. त्यानंतर त्यांनी पती आणि शेजार्‍यांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. गुन्हा घडल्यानंतर स्वतःच्या हाताची नस परागने कापून घेतल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.  तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.