Thu, Jul 18, 2019 02:19होमपेज › Pune › ‘ओपन बार’ने शहराचे  ‘स्वास्थ्य’ धोक्यात

‘ओपन बार’ने शहराचे  ‘स्वास्थ्य’ धोक्यात

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:37AMपुणे : अक्षय फाटक

शिक्षणाचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहराच्या रस्त्या-रस्त्यावर ‘ओपन’ बार बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शहरात याची संख्या शेकडोवर असून या परिसरातच मद्यपी पेगवर पेग रिचवून धिंगाणा घालतात. पदपथांवरील अंडाभुर्जी, चायनीज व अन्य स्टॉलवरही मद्यपींची मोठी गर्दी असते. नशेत झिंगलेल्यांकडून रस्त्यावर गुन्हे घडतात. परिणामी  शहराचे स्वास्थ्य बिघडत आहे. धक्कादायक म्हणजे, या वाढत्या ‘ओपन बार’ संस्कृतीला पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘अर्थपूर्ण’ सहमती असल्याची माहिती समोर आली आहे. 

शहरात दीड हजारांवर बिअर शॉपी व पावणेतीनशेच्या जवळपास वॉईन शॉप आहेत. नियमानुसार  मद्य पिण्याचा परवाना असणार्‍यांना मद्य देण्याची त्यांना परवानगी असते. तसेच, वॉईन व बिअर शॉपीच्या शंभर मीटर अंतर परिसरात मद्य पिण्यास  बंदी आहे. मात्र, शहरातील स्थिती यापेक्षा उलट असून अनेक ठिकाणी बिअर शॉपी आणि वॉईन शॉपसमोरच मद्यपी पेग रिचवताना दिसतात. या ओपन बारसमोरील तळीरामांमुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्यावरच हे ओपन बार बिनदिक्कतपणे सुरू असल्याने तेथून वावरणार्‍या महिलाहीं त्रस्त आहेत. हे रोखण्याची जबाबदारी पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाची आहे.

 वाईन व बारचालक, तळीरामांच्या दहशतीला भीक न घालता काही ठिकाणच्या रहिवाशांनी पोलिसांकडे धावही घेतली. पोलिसांकडून तात्पुरती कारवाई केली जात आहे. मद्यपान करणार्‍यांना तेथून पोलिस ठाण्यात आणतात, त्यांना समज देऊन सोडून देतात. जुजबी कारवाई होत असल्याने मद्यपींचे धाडस आणखीनच वाढते.  अनेक ठिकाणी मद्यपींसाठी बसण्याची सोयही केल्याचे पाहणीत समोर आले आहे.  रस्त्या-रस्त्यावरील ओपन बार सांस्कृतिक शहराचे स्वास्थ्य बिघडवत असून,  आता या मद्यपींना आवर कोण घालणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुख्य कारणांपैकी मद्याची झिंग हे एक कारण आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे नशेतच घडल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. मद्यपींमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. नशेत वाहने चालवून हे मद्यपी स्वत:चा जीव तर धोक्यात घालत आहेतच, पण सामान्यांच्या जिवाशीही खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत भरघाव कार चालवताना झालेल्या अपघात तिघांना जीव गमवावा लागला. असेच प्रकार सातत्याने शहरातील विविध भागात घडत आहेत. 

अवैध दारूविक्री आणि रस्त्यावर मद्य रिचविण्यास प्रतिबंध घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके कार्यरत आहेत. यासोबतच स्थानिक पोलिसांनाही उघड्यावर मद्य पिणार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र, दरमहा होणार्‍या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे मद्यपींचा धिंगाणा रस्त्यावर खुलेआम सुरू आहे. याकडे दोन्ही विभागांनी लक्ष देणे आवश्यक असून, अन्यथा मोठ्या घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. 


 स्टॉलही मद्यपींचे अड्डे

शहरात पदपथांवरील चटपटीत (अंडाभुर्जी व चायनीज स्टॉल) खाद्यपदार्थांच्या स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  काही ठिकाणी हेच स्टॉल या मद्यपींच्या हक्काच्या बैठकीची ठिकाणे झालेली आहेत.  या स्टॉलमधूनच मद्य पिण्यासाठी लागणारे ग्लास, त्यासोबच चकना, सिगारेट, गुटखा  सहज मिळत आहे. येथे  झिंगलेल्यांची गर्दी असल्याने या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सर्वसामान्य व्यक्ती जाण्याचे धाडस करत नाही. 
--------------------------------
परवाना नसताना दिले जाते मद्य

वॉईन शॉप व बिअर शॉपीतील मद्य खरेदी करून ते घरी नेऊन पिण्यासाठी दिलेले असते. ज्या व्यक्तीकडे   मद्य पिण्याचा परवाना आहे, त्यांनाच मद्य विकणे अपेक्षित असते.   परंतु बहुतांश बिअर व वॉईन शॉपीधारक हा नियम धाब्यावर बसवून आलेल्या प्रत्येकाला बिनदिक्कतपणे मद्यविक्री करतात. घरात मद्य पिण्याला होणारा विरोध आणि महागडे बिअरबार दररोज घेणार्‍यांना परवडत नाहीत. त्यामुळे मद्य मूळ किंमतीत मिळत असल्याने वाईन शॉप व बारमधून घेतले जाते. तेथून जवळच  किंवा थोड्या अंतरावरील अंडाभुर्जी, चायनीजच्या स्टॉलवर पेगवर पेग रिचवले जात आहेत.