होमपेज › Pune › नांदेड पुलावरून दुचाकीस्वार गेला वाहून

नांदेड पुलावरून दुचाकीस्वार गेला वाहून

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:17AMपुणे/खडकवासला : प्रतिनिधी

हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड-शिवणे पुलावरून मोटरसायकलस्वार मुठा नदीत वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी (दि. 18 ऑगस्ट) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, त्या चालकाचा शोध तसेच, त्याबाबतची कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या मुठा नदीत पाणी सोडल्याने पूर आलेला आहे. 

शहरासह धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धराणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. दरम्यान, शनिवारी मुठा नदीवरील नांदेड पुलावरून शिवणेच्या दिशेने 40 वर्षीय मोटारसायकलस्वार चालला होता. या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी आहेत. त्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुलावरून मोटारसायकल सुसाट घेऊन गेला. दुर्दैवाने पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मोटारसायकलसह तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर येथील नागरिकांनी व बंदोबस्तावरील कर्मचार्‍यांनी शोध घेतला. परंतु, तो मिळाला नाही. 

पोलिसांकडून या मोटारसायकलस्वाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचे नाव तसेच इतर माहिती मिळालेली नाही. या बाबत तपास सुरू असल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे ठाणे अमंलदार एस.एस. शिंदे यांनी सांगितले. 

खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नांदेड व शिवणे गावांना जोडणार्‍या मुठा नदीवरील पूल वारंवार पुराच्या पाण्यात बुडत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. असे असताना काही जण धोकादायक पुलावरून ये जा करत आहेत. गेल्या वर्षी पुलावरून मोटरसायकल चालक तसेच पदचारी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले होते. दरवर्षी अशा दुर्घटना घडत आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.