Mon, Mar 25, 2019 03:25
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पीएमपी कर्मचार्‍यांना आता महिन्यात एकच रजा

पीएमपी कर्मचार्‍यांना आता महिन्यात एकच रजा

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 12:04AMपुणे :  प्रतिनिधी 

 सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कडक धोरण अवलंबिले असून, सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा घेण्यात येणार असल्याच्या सूचना परिपत्रकाव्दारे जारी करण्यात आला  आहे. या सूचनेची अंमलबजावणी बुधवारपासून (दि.7) करण्यात आली असल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे. पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कर्मचारी तसेच प्रशासकीय यंत्रणेबाबत अत्यंत कडक नियम राबविण्यास सुरूवात केली आहे .कामचुकार कर्मचा-यांसह अधिका-यांना नियमानुसार घरचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. जे कर्मचारी कोणतीही आगाऊ सूचना न देता वारंवार गैरहजर राहत असून , आजारी असल्याचे भासवून महापालिकेच्या दखान्यातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखल केल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचा-यांनाही नोटीस बजावून त्यांना निलंबित करण्यात  आले आहे. 

आता पीएमपीचे वाहक,चालक त्याचबरोबर प्रशासनात कार्यरत असलेले कोणताही कर्मचारी अगर अधिकारी असला तरी त्यास महिन्यातून केवळ एकच रजा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. याबबत  सर्व आगारांचे अधिकारी आणि मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांची सोमवारी (दि.5) बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कर्मचा-यास महिन्यातून केवळ एकच रजा घेण्यात येणार आहे.तसेच पूर्व परवानगी शिवाय अचानक कोणत्याही कर्मचा-याने रजा घेतल्यास ती  ग्राह्य धरण्यात येणार नाही. असे जाहीर करण्यात आले आहे. जो कर्मचारी परवानगी न घेता गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ज्या कर्मचा-यांनी या निर्णयाच्या अगोदर दोन रजा घेतल्या असतील त्यांनी  सोयीनुसार एकच रजा घेणे  तसेच कार्यालयाशी याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.