Wed, Mar 20, 2019 03:02होमपेज › Pune › जिल्हा बँकांची 112 कोटींसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

जिल्हा बँकांची 112 कोटींसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:37AMपुणे ः प्रतिनिधी 

जुन्या नोटांसंदर्भात ‘नाबार्ड’ने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मंगळवारी झालेल्या संबंधित आठ बँकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘नाबार्ड’ने बँकांना पत्र पाठवून आठ जिल्हा बँकांतील 112 कोटींच्या जुन्या नोटा ‘लॉस अ‍ॅसेट’ (बुडीत) दाखवून त्याची तरतूद करण्याची सूचना केली आहे.  पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत जुन्या नोटांच्या निर्णयाच्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह आठही जिल्हा बँकांचे सीईओ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकाराव्यात या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा एकमुखी ठराव करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. ते म्हणाले, 8 नोव्हेंबर 2016 रोजीच्या आणि त्यापूर्वीच्या जिल्हा बँकेत शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटा ‘आरबीआय’ने स्वीकारल्या नाहीत. ही रक्कम जिल्हा बँकेत पडून आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर,  अहमदनगर, नाशिक, वर्धा, अमरावती, नागपूर या आठ जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या रद्द नोटांचे शिल्लक 112  कोटी रुपये आरबीआय, ‘नाबार्ड’ने बुडीत (लॉस असेट) ठरविले आहेत.

ही रक्कम ‘लॉस असेट’ दाखवून वैधानिक लेखापरीक्षक यांच्या सल्ल्यानुसार ताळेबंदात ‘एनपीए’ तरतूद करावी, असे ‘नाबार्ड’ने कळविले आहे. या निर्णयामुळे अडचण निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. 9 नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश होते. 10 नोव्हेंबरपासून बँकांचे कामकाज सुरू झाले होते.